दारूच्या नशेत गाडी चालवल्यास दोन महिने भोगावा लागणार तुरुंगवास
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2019 09:28 AM2019-06-06T09:28:16+5:302019-06-06T09:36:10+5:30
दारूच्या नशेत गाडी चालवणं आता महागात पडणार आहे.
नवी दिल्लीः दारूच्या नशेत गाडी चालवणं आता महागात पडणार आहे. यासाठी कडक कायदा बनवण्यात आला असला तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नव्हती. यासंदर्भात दिल्लीतल्या न्यायालयात एका प्रकरणात सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयानं अशा वाहन चालकांना काही दिवसांचा नव्हे, तर काही महिन्यांच्या तुरुंगावासाची शिक्षा दिली पाहिजे, असं मत व्यक्त केलं आहे. साकेतमधल्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुनाली गुप्ता यांनी दारू पिऊन गाडी चालवण्याचा आरोप असलेल्या मोहन नामक एका व्यक्तीला दोन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
नशेच्या परिस्थितीत गाडी चालवण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढले आहेत. गेल्या काही वर्षांपासून दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांच्या संख्येत 30 ते 40 टक्क्यांची वाढ झाली आहे. तसेच नशेच्या अवस्थेत पकडलेल्या गाडी चालकांना शिक्षाही फार कमी दिली जाते. शिक्षा कमी असल्यानं दारू पिऊन गाडी चालवण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. त्यामुळे अशा चालकांना काही दिवसांचा नव्हे, तर काही महिन्यांचा तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली पाहिजे, असंही न्यायालयानं सुनावलं आहे. तसेच मोहन यांना 3 हजारांचा दंडही भरावा लागला आहे.
काय आहे प्रकरण?
आरोपी मोहनला दोन वर्षांपूर्वी पोलिसांनी आश्रम चौक येथे बाइकवरून जात असताना पकडलं. त्यावेळी त्यानं नशा केलेली होती. नशेच्या अवस्थेत मोहन चुकीच्या पद्धतीनं मोटारसायकल चालवत होता. चौकशीतही मोहननं दारू प्यायल्याची पुष्टी झाली.