अपहार प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश: आयुक्तांचा निर्णय
By admin | Published: January 8, 2016 11:20 PM2016-01-08T23:20:23+5:302016-01-09T12:19:41+5:30
महापालिकेत मालमत्ता कर भरणा प्रकरणी ४१ लाख रुपयांचा अपहार करणार्या लिपिकाविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश आयुक्त विलास ढगे यांनी दिले आहेत. प्रशांत लोंढे असे अपहार करणार्या लिपिकाचे नाव आहे. अपहाराची रक्कम त्याने महापालिकेच्या तिजोरीत जमा केली आहे.
अहमदनगर : महापालिकेत मालमत्ता कर भरणा प्रकरणी ४१ लाख रुपयांचा अपहार करणार्या लिपिकाविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश आयुक्त विलास ढगे यांनी दिले आहेत. प्रशांत लोंढे असे अपहार करणार्या लिपिकाचे नाव आहे. अपहाराची रक्कम त्याने महापालिकेच्या तिजोरीत जमा केली आहे.
शहर प्रभाग समिती कार्यालयात दोन महिन्यापूर्वी हा प्रकार समोर आला. सुमारे दोन वर्षापासून अपहार सुरू असल्याचे तपासणीत समोर आले. मालमत्ताधारकाने कराचा भरणा केला. मात्र, तो भरणा लोंढे याने तिजोरीत झाल्याचे भासविले. प्रत्यक्षात या रकमेचा अपहार केला. हा प्रकार समोर आल्यानंतर चौकशी समिती स्थापन करून तपासणी करण्यात आली. त्यात ४१ लाख रुपयांचा अपहार झाल्याचे समोर आले. लोंढे याने अपहार केल्याची लेखी कबुली देत अपहाराची रक्कम महापालिकेच्या तिजोरीत जमा केली. त्यानंतर उपायुक्त अजय चारठाणकर यांनी संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची शिफारस आयुक्तांकडे केली. आयुक्तांनी यासंदर्भात विधिज्ञाचे मत मागविले. त्यांनीही गुन्हा दाखल करण्याचे मत नोंदविले. त्यानंतर आयुक्त विलास ढगे यांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
अनेक दिवस उलटले तरी आयुक्त निर्णय देत नसल्याने चर्चेला उधाण आले होते. काही संघटनांनीही आयुक्तांना याबाबत विचारणा केली होती. अखेर आयुक्तांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावे लागले. (प्रतिनिधी)