गोहत्या करणाऱ्यांची हत्या करा हा तर वेदांचाच आदेश
By admin | Published: October 18, 2015 10:34 PM2015-10-18T22:34:23+5:302015-10-18T22:34:23+5:30
‘गोहत्या करणे हे पाप आहे आणि असे पाप करणाऱ्यांची हत्याच केली पाहिजे,’ असे वेदांमध्ये सांगण्यात आले
नवी दिल्ली : ‘गोहत्या करणे हे पाप आहे आणि असे पाप करणाऱ्यांची हत्याच केली पाहिजे,’ असे वेदांमध्ये सांगण्यात आले असल्याचे नमूद करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ‘पांचजन्य’ या मुखपत्रामधून दादरी येथे झालेल्या मोहंमद इकलाख या मुस्लिम व्यक्तीच्या हत्येचे उघड उघड समर्थन केले आहे. इकलाखाची हत्या ‘विनाकारण’ करण्यात आलेली नाही आणि वेदांनीही गोहत्या करणाऱ्यांना ठार मारणे अनिवार्य करण्यात आले आहे, असेही या मुखपत्रात म्हटले आहे.
‘इस उत्पात के उस पार’ या मथळ्याखाली ‘पांचजन्य’च्या ताज्या अंकात प्रसिद्ध झालेल्या या लेखातून वेदांचा हवाला देत अशा हत्यांचे समर्थन करण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, ‘जो कुणी गोहत्या करेल त्याला ठार मारा असा आदेश वेदाने दिलेला आहे. गाय ही हिंदू समाजासाठी मानबिंदू आहे. आमच्यापैकी बहुतेकांसाठी तर तो जीवन-मरणाचा प्रश्न आहे. मदरसे आणि मुस्लिम नेते युवा मुसलमानांना देशाच्या परंपरेचा द्वेष करण्याचे शिकवितात. इकलाखनेही अशाच चुकीच्या सल्ल्यामुळे कदाचित गायीची कुर्बानी दिलेली असावी.’
दादरीत यापूर्वी कधीही सांप्रदायिक हिंसाचाराची घटना घडलेली नाही. त्यामुळे इकलाखची हत्या कारणांशिवाय झाली असेल यावर कुणीही विश्वास ठेवू शकणार नाही. प्रत्येक क्रियेची सारखीच प्रतिक्रिया ही असतेच, असे न्यूटनचा नियम सांगतो. शांततेचा इतिहास असलेल्या दादरीत ही घटना (इकलाखच्या हत्येची) कारणांशिवाय घडली नसणारच, असेही या लेखात म्हटले आहे. आताचे मुस्लिम हे कधीकाळी हिंदूच होते. इकलाखचे पूर्वजही पूर्वी हिंदू आणि गोरक्षक होते आणि त्यांनीही अन्य अनेक लोकांप्रमाणे गोहत्या करणाऱ्यांना दंड दिला असणार. हे गोसंरक्षक असे गोहत्या करणारे का बनले असावेत, असा सवालही यात केला आहे.
सामाजिक सद्भावनेसाठी एकमेकांच्या भावनांचा सन्मान करणे आवश्यक आहे. भारतात न्यायप्रणाली आहे आणि कुणालाही कायदा हाती घेण्याची परवानगी दिली जाऊ नये हे खरे; परंतु बहुसंख्य समाजाच्या मन:स्थितीचीही चिंता केली पाहिजे, असेही त्यात म्हटले आहे.
देशभरातील लेखक आणि साहित्यिकांनी वाढती असहिष्णुता आणि दादरीसारख्या घटनांच्या विरोधात जी ‘पुरस्कार वापसी’ मोहीम सुरू केली आहे, त्यावरही ‘पांचजन्य’ने टीका केली आहे. ‘कहां बचा सन्मान’ या शीर्षकाखाली अनेक लेख प्रकाशित करण्यात आले आहेत. ‘विद्यमान रालोआ सरकारच्या नेतृत्वात देश विकासाकडे आगेकूच करीत असल्याचे पाहून भारताविरुद्ध रचलेला हा मोठा कट आहे. हे लेखक व साहित्यिक त्याचे बाहुले बनले आहेत,’ असे एका लेखात म्हटले आहे.
त्यात म्हटले आहे की, ‘हल्ली साहित्य क्षेत्रातील काही नावे प्रसिद्धी मिळविण्याच्या स्पर्धेत उतरली आहेत. एका विशिष्ट गटाचे नेतृत्व करण्याचा दावा करीत असलेल्या या साहित्यिकांनी निवडक घटनांच्या आडून पुरस्कार परत करण्याची सुरुवात केली आहे; पण अन्य घटनांवर मात्र ते मौन पाळून आहेत.
(लोकमत न्यूज नेटवर्क)