माल्याला 10 जुलैला सुरक्षितरीत्या हजर करा, कोर्टाचे गृहमंत्रालयाला आदेश
By admin | Published: May 10, 2017 04:48 PM2017-05-10T16:48:46+5:302017-05-10T16:48:46+5:30
9000 कोटींचा घोटाळा करून इंग्लंडमध्ये फरार झालेला उद्योगपती विजय माल्याला 10 जुलै रोजी न्यायालयात हजर करा
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 10 - 9000 कोटींचा घोटाळा करून इंग्लंडमध्ये फरार झालेला उद्योगपती विजय माल्याला 10 जुलै रोजी न्यायालयात हजर करा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयानं केंद्रीय गृहमंत्रालयाला दिला आहे. तसेच विजय माल्याला सुरक्षितरीत्या आणण्याची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्रालयाची असल्याचंही न्यायालयानं यावेळी स्पष्ट केलं आहे. कर्नाटक उच्च न्यायालयानंही काही दिवसांपूर्वी विजय माल्याला मोठा झटका दिला होता. त्यावेळी 40 मिलियन यूएस डॉलर म्हणजे सुमारे अडीचशे कोटी रुपये बँकांचं कर्ज विजय माल्याच्या यूबी ग्रुपकडूनच वसूल करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते.
किंगफिशर एअरलाइन्स या आपल्या डब्यात गेलेल्या कंपनीसाठी सरकारी बँकांकडून घेतलेली सुमारे 9000 कोटी रुपयांची कर्जे बुडवून देशातून परागंदा झालेला मद्यसम्राट उद्योगपती विजय माल्ल्याला सर्वोच्च न्यायालयाने न्यायालयीन अवमानाबद्दल दोषी ठरविले आणि याबद्दल शिक्षा सुनावण्यासाठी माल्ल्याला 10 जुलै रोजी केंद्रीय गृहमंत्रालयानं न्यायालयात हजर करावे, असा आदेश दिला आहे.