NGTचा आदेश; हवेची गुणवत्ता खराब असलेल्या राज्यांत 30 नोव्हेंबरपर्यंत फटाक्यांवर बंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2020 12:03 PM2020-11-09T12:03:33+5:302020-11-09T12:06:42+5:30
एनजीटीने आपल्या आदेशात म्हटले आहे, की गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी नोव्हेंबर महिन्यात एक्यूआयची पातळी मॉडरेट अथवा योग्य पातळीवर आहे, तेथे केवळ ग्रीन फटाकेच विकले जातील.
दिल्ली - एनसीआरमध्ये वाढत्या हवा प्रदूषणाचा विचार करता, नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनलने (एनजीटी) मोठा निर्णय घेतला आहे. एनजीटीने सोमवारी आदेश देताना दिल्ली-एनसीआरमध्ये 30 नोव्हेंबरपर्यंत फटाक्यांवर बंदी घातली आहे. एवढेच नाही, तर इतर राज्यांतही हवेची गुणवत्ता खराब असलेल्या ठिकाणी फटाके उडविण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
दिल्ली-एनसीआरमधील प्रदूषण पातळीवर सुनावणी करताना एनजीटीने संपूर्ण देशात फटाके वापरासंदर्भात आदेश दिला आहे. हवा प्रदूषणाची पातळी अधिक असलेल्या ठिकाणी 9 ते 30 नोव्हेंबरपर्यंत फटाक्यांची विक्री आणि वापरावर बंदी असेल. मात्र, जेथे एअर क्वालिटी योग्य अथवा मॉडरेट आहे, तेथे फटाके उडवले जाऊ शकतात. असे एनजीटीने म्हटले आहे.
एनजीटीने म्हटले आहे, की 9 ते 30 नोव्हेंबरदरम्यान एनसीआरमध्ये फटाके विक्री आणि वापरावर पूर्णपणे बंदी असेल. 30 नोव्हेंबरनंतर यासंदर्भात समीक्षा केली जाईल. यानुसार, जेथे मागील वर्षीच्या आकडेवारीच्या तुलनेत या नोव्हेंबर महिन्यात सरासरी एक्यूआय खराब अथवा धोकादायक पातळीवर असेल, अशा सर्वच शहरांत फटाक्यांवर बंदी असेल.
एनजीटीने आपल्या आदेशात म्हटले आहे, की गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी नोव्हेंबर महिन्यात एक्यूआयची पातळी मॉडरेट अथवा योग्य पातळीवर आहे, तेथे केवळ ग्रीन फटाकेच विकले जातील. तसेच दीवाळीच्या दिवशी फकाटे केवळ दोन तासंच उडवता येतील. याशिवाय इतर दिवशी फटाके उडवता येणार नाहीत.
दिल्ली सरकारने ग्रीन फटाके उडवण्यावरही बंदी घातली होती. मात्र, उत्तर प्रदेश आणि हरियाणा सारख्या राज्यांनी अद्याप फटाक्यांवर बंदी घालण्याचा कसल्याही प्रकारचा आदेश दिलेला नव्हता.