शेतकऱ्यांना रोखण्यासाठी ३० हजार अश्रूधुराच्या नळकांड्यांची ऑर्डर!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 06:49 AM2024-02-16T06:49:51+5:302024-02-16T06:50:34+5:30

दिल्लीत प्रवेश करू न देण्याचा पोलिसांचा निर्धार; इंटरनेट बंदच

Order of 30 thousand tear gas canisters to stop the farmers! | शेतकऱ्यांना रोखण्यासाठी ३० हजार अश्रूधुराच्या नळकांड्यांची ऑर्डर!

शेतकऱ्यांना रोखण्यासाठी ३० हजार अश्रूधुराच्या नळकांड्यांची ऑर्डर!

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : पंजाबच्या शेतकऱ्यांचा ‘चलो दिल्ली’ मोर्चा राष्ट्रीय राजधानीत प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी ३०,००० हून अधिक अश्रूधुराच्या नळकांड्यांची ऑर्डर दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. हा मोर्चा रोखण्यासाठी पोलिस दल जय्यत तयारी करत आहे.

शेकडो शेतकऱ्यांना दिल्लीपासून सुमारे २०० किलोमीटर अंतरावर असलेल्या अंबालाजवळ हरयाणाला लागून असलेल्या राज्याच्या सीमेवर रोखण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांच्या एका सूत्राने सांगितले की, आंदोलक पुढे आल्यास त्यांना दिल्लीत प्रवेश करू न देण्याचा पोलिसांचा निर्धार आहे. त्यासाठी दिल्ली पोलिसांनी आधीच मोठ्या प्रमाणात अश्रूधुराच्या नळकांड्यांचा साठा केला आहे आणि मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधील टेकनपूर येथे असलेल्या बीएसएफच्या टीयर स्मोक युनिटकडून (टीएसयू) आणखी ३०,००० नळकांड्या मागवल्या आहेत. त्या ग्वाल्हेरहून दिल्लीत आणल्या जात आहेत. दरम्यान, पंजाब, हरयाणामध्ये इंटरनेट बंद करण्यात आले आहे.

पोलिस सतर्क
nआंदोलन सुरूच राहिल्याने दिल्लीतील मोक्याच्या ठिकाणी दंगलविरोधी पथक, सुरक्षा कर्मचारी तैनात आहेत. 
nहरयाणासह टिकरी आणि सिंघू या दोन सीमा बंद असताना, उत्तर प्रदेशच्या गाझीपूर सीमेवरून वाहतुकीला परवानगी देण्यात आली.

नळकांड्यांची एक्स्पायरी तीन वर्षे
प्रत्येक अश्रूधुराचे नळकांडे जास्तीत जास्त तीन वर्षांपर्यंत वापरता येते, त्यानंतर त्यांचा प्रभाव हळूहळू कमी होतो, परंतु ते सैन्याच्या सरावासाठी सात वर्षांपर्यंत वापरले जातात. एक्स्पायरी झालेल्या अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर आंदोलनात करण्यात आल्याचे समोर आले आहे.

‘आमच्या शेतकऱ्यांना सोडा’
नवी दिल्लीकडे कूच करताना भोपाळमध्ये ताब्यात घेण्यात आलेल्या कर्नाटकातील शेतकऱ्यांची सुटका करण्यात यावी, अशी विनंती कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांना केली आहे.

Web Title: Order of 30 thousand tear gas canisters to stop the farmers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.