सीमारेषेजवळील 27 गावे खाली करण्याचे आदेश, बॉर्डरवर 10 हजार सैन्याचा ताफा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2019 10:45 AM2019-02-24T10:45:50+5:302019-02-24T10:46:32+5:30
सीमारेषेवर पाकिस्तानी रेंजर्स आणि दहशतवाद्याकडून चकमकी सुरूच आहेत
श्रीनगर - पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीर सीमारेषवर मोठा तणाव निर्माण झाला आहे. तर, पाकिस्तानी रेंजर्स आणि दहशतवाद्यांकडून सीमारेषेवर कारवाया सुरूच आहेत. तर, भारतीय सैन्याकडूनही पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर देण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर काश्मीरमध्ये निमलष्करी दलाच्या 100 तुकड्या पाठविण्यात येत असून सुमारे 10 हजार जवान तिथे निघाले आहेत. तर काश्मीरच्या राजौरी जिल्ह्याच्या नौशेरा सेक्टरमधील 27 पेक्षा अधिक गावे खाली करण्यात आली आहेत.
सीमारेषेवर पाकिस्तानी रेंजर्स आणि दहशतवाद्याकडून चकमकी सुरूच आहेत. बुधवारी आणि गुरूवारी सीमा रेषेवर झालेल्या गोळीबारांनंतर येथील गांवांना खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच या गावातील स्थलांतरीतांना आवश्यक ते सामान सोबत घेण्यास बजावले असून शाळा आणि सरकारी भवनांमध्ये आश्रय देण्यात येत आहे. पाकिस्तानी सीमारेषेपासून दूर असलेल्या ठिकाणी या गाववाल्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. एलओसीजवळी गावांना खाली करण्यासंदर्भात नोटीस जारी करण्यात आल्याची सुत्रांची माहिती आहे. मात्र, येथील गावकरी आपल्याच गावात राहण्यास उत्सुक असल्याचं राजौरी जिल्ह्याचे पोलीस उप-आयुक्त मोहम्मद एजाज असद यांनी गावचा दौरा केल्यानंतर म्हटले. मात्र, सुरक्ष जवानांकडून त्यांना सरकारी योजनांची माहिती देण्यात येत असून त्यांचे मन विळविण्यात येत असल्याचेही असद यांनी सांगितले.
दरम्यान, पाकिस्ताननेही सीमेवरील गावे अन्यत्र हलविण्याचा निर्णय घेतला असून, त्या ठिकाणी लष्करातर्फे बंकर उभारण्याची सुरुवातही केली आहे. भारतातर्फे पाकिस्तानवर हल्ला होईल, अशी भीती त्या देशात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी राजस्थानमधील सभेत म्हणाले की, पुलवामाचा बदला कसा घ्यायचा, हे लष्कराला माहीत आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर 100 तासांच्या आत हल्ल्याला मदत करणाऱ्यांना जिथे पाठविणे गरजेचे होते, तेथे जवानांनी धाडले आहे. लष्कराला सरकारने पूर्ण मोकळीक दिली आहे. पाकिस्तानविरोधी लढ्याचे सारे मार्ग आम्ही खुले ठेवल्याचे अर्थमंत्री जेटली यांनीही नमूद केले.