सुरक्षेच्या प्रश्नावरुनच NDTVला प्रक्षेपण बंद ठेवण्याचे आदेश - मनोहर पर्रीकर
By admin | Published: November 5, 2016 07:10 PM2016-11-05T19:10:28+5:302016-11-05T19:15:25+5:30
एनडीटीव्हीवरील बंदीचा विषय सुरक्षा व्यवस्थेशी विषय संबंधित असल्याचे केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर बोलले आहेत
Next
>ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 5 - एनडीटीव्हीवरील बंदीचा विषय देशभर गाजत असताना केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सुरक्षा व्यवस्थेशी हा विषय संबंधित असल्याचे व टीव्ही चॅनलच्या व्यवस्थापनाने मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचे म्हटले आहे. बंदी घातलेली नसून केवळ दिवसभरासाठी प्रक्षेपण बंद ठेवण्यास सांगितले आहे, असे ते म्हणाले.
दहशतवादी हल्ल्यांचे थेट प्रक्षेपण केले जाऊ नये यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करण्यात आलेली आहेत ती सर्वांनीच पाळायला हवीत. थेट प्रक्षेपण केल्यास अतिरेक्यांना माहिती मिळते आणि त्याचा गैरफायदा उठविला जाऊ शकतो. पठाणकोट हल्ल्याच्या प्रक्षेपणात या मार्गदर्शक तत्त्वांचा भंग केल्याचे दिसून आले आहे.
काँग्रेस सरकारच्या कारकिर्दित वेगवेगळ्या २१ घटनांच्या वेळी अशी मार्गदर्शक तत्त्वे घालून देण्यात आली. मुंबईतील २६/११ च्या हल्ल्यानंतर कडक मार्गदर्शक तत्त्वे घातली गेली, असे पर्रीकर म्हणाले.
केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयाने येत्या ९ रोजी एनडीटीव्हीला प्रक्षेपण बंद ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. केंद्रीय संरक्षणमंत्री गोव्यात आले असता पत्रकारांनी त्यांच्याकडे हा विषय उपस्थित केला. ही आणीबाणी नव्हे तर दुसरे काय, असा सवाल पर्रीकर यांना पत्रकारांनी केला असता त्यांनी वरील उत्तर दिले तसेच पत्रकारांच्या भावना केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयाला कळविण्याचे आश्वासनही दिले.