३00 कोटी भरण्याचे सुब्रतो रॉय यांना आदेश
By admin | Published: July 12, 2016 12:46 AM2016-07-12T00:46:25+5:302016-07-12T00:46:25+5:30
सहारा समूहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांचा पॅरोल ३ आॅगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय देतानाच सर्वोच्च न्यायालयाने त्यांना आणखी ३00 कोटी रुपये जमा करण्याचे आदेश दिले आहेत
नवी दिल्ली : सहारा समूहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांचा पॅरोल ३ आॅगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय देतानाच सर्वोच्च न्यायालयाने त्यांना आणखी ३00 कोटी रुपये जमा करण्याचे आदेश दिले आहेत. रॉय यांनी ३ आॅगस्टपर्यंत ही रक्कम जमा करायची आहे. ती रक्कम वेळेत न भरल्यास रॉय यांना पुन्हा तुरुंगात जावे लागेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे न्या. टी. एस. ठाकूर हे प्रमुख असलेल्या खंडपीठाने सोमवारी हा निर्णय दिला. सुब्रतो रॉय यांची न्यायालयाने ६ मे रोजी एका आठवड्यासाठी पॅरोलवर सुटका केली करण्याचा निकाल दिला होता. पुढे ११ मे रोजी त्यांचा पॅरोल आणखी दोन महिन्यांनी वाढवण्यात आला. रॉय यांनी गुंतवणूकदारांचे १७ हजार ६00 कोटी रुपये व्याजासकट परत करावेत, असे आदेश न्यायालयाने २0१२ साली दिले होते.
रॉय यांच्या सहारा इंडिया रिअअल इस्टेट कॉर्पोरेशन लिमिटेड आणि सहारा हाउसिंग फायनान्स कॉर्पोरेशन या दोन कंपन्यांनी २00७ ते २00८ या काळात परिवर्तनीय रोख्यांतून ही रक्कम जमा केली होती.