मदरशांनी 15 ऑगस्टला 'तिरंगा' फडकवावा - योगी सरकारचा आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2017 02:38 PM2017-08-11T14:38:48+5:302017-08-14T08:45:40+5:30
सर्व मदरशांना येत्या 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी मदरशांमध्ये ध्वजारोहण आणि राष्ट्रगीत गायनाचे निर्देश दिले आहेत.
लखनऊ, दि. 11 - उत्तर प्रदेशातील मदरसा शिक्षा परिषदेने त्यांच्याशी संबंधित असणा-या सर्व मदरशांना येत्या 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी मदरशांमध्ये ध्वजारोहण आणि राष्ट्रगीत गायनाचे निर्देश दिले आहेत. 15 ऑगस्टला भारत 70 वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. मदरशा शिक्षा परिषदेने परिपत्रक जारी केले असून, त्यांच्याशी संबंधित असणा-या सर्व मदरशांना आदेशांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.
मदरशांना प्रथमच स्वातंत्र्यदिनी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यास सांगितले आहे. यापूर्वी सुद्धा मदरशांना ध्वजारोहण आणि राष्ट्रगीत गायनाचे निर्देश दिले होते. स्वातंत्र्यदिनी मदरशांमध्ये होणा-या कार्यक्रमांचेही व्हिडीओ रेकॉर्डींग करण्याचे आदेश आहेत. उत्तर प्रदेशात मदरसा परिषदेने 8 हजार मदरशांना मान्यता दिली आहे. यातील 560 मदरशांना राज्य सरकारकडून अनुदान दिले जाते.
ध्वजारोहण आणि राष्ट्रगीत गायन सकाळी आठ वाजता घेण्यास सांगितले आहे. कार्यक्रमाच्या शेवटी मिठाई देण्यात येईल. परिषदेने राष्ट्रगीत हिंदी आणि ऊर्दू दोन्ही भाषांमध्ये पाठवले आहे. योगी आदित्यनाथ सरकारच्या या निर्णयावरुन उत्तरप्रदेशात मोठा गहजब होण्याची शक्यता आहे.