अजबच! म्हणे, "श्रीराम मंदिरात रावणाचीही भव्य मूर्ती स्थापन करा"; पंतप्रधान मोदींना पत्र
By देवेश फडके | Published: January 23, 2021 11:08 AM2021-01-23T11:08:57+5:302021-01-23T11:11:04+5:30
मथुरामधील एका मंडळाकडून श्रीराम मंदिरात रावणाचीही भव्य मूर्ती स्थापन करा, अशी अजब मागणी करण्यात आली आहे. एवढेच नव्हे, तर या संघटनेनेन पंतप्रधान नरेंद्र मोदींना यासंदर्भात पत्रही पाठवले आहे.
मथुरा : अयोध्येत श्रीरामांचे भव्य मंदिराचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. यासाठी देशव्यापी देणग्या देण्यासाठी मोहीमही सुरू करण्यात आली आहे. मात्र, आता मथुरामधील एका मंडळाकडून श्रीराम मंदिरात रावणाचीही भव्य मूर्ती स्थापन करा, अशी अजब मागणी करण्यात आली आहे. एवढेच नव्हे, तर या संघटनेनेन पंतप्रधान नरेंद्र मोदींना यासंदर्भात पत्रही पाठवले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मथुरा येथे लंकेश भक्त मंडळ आहे. या मंडळाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीराम जन्मभूमि न्यास यांच्या अध्यक्षांना पत्र लिहिण्यात आले आहे. या पत्रात अयोध्येत बांधल्या जात असलेल्या श्रीराम मंदिरात दशानन रावणाची मूर्ती स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे. श्रीराम मंदिरासह रावणाच्या मूर्तीसाठीही लंकेश भक्त मंडळाकडून देणगी दिली जाईल, असे सांगण्यात आले आहे.
अयोध्या धाम येथे उभारण्यात येणाऱ्या अद्भूत मंदिरात श्रीरामांचे आचार्य दशानन यांचीही भव्य मूर्ती स्थापन करण्यात यावी, या मागणीमागे या मंडळाकडून अजब दावा करण्यात आला आहे. यानुसार, लंकेवर विजय मिळावा, यासाठी श्रीरामांनी रामेश्वरम येथे पूजा केली होती. यावेळी दशानन आचार्य म्हणून उपस्थित होते. श्रीरामांनी आचार्य म्हणून येण्यासाठी दशाननांना निमंत्रण पाठवले होते. जाम्बुवंत हे निमंत्रण घेऊन गेले होते. दशाननांनी ते निमंत्रण स्वीकारले आणि रामेश्वरम येथे पूजेसाठी आचार्य म्हणून उपस्थित राहिले होते, असा दावा मंडळाकडून करण्यात आला आहे.
लंकेश भक्त मंडळाचे अध्यक्ष ओमवीर सारस्वत यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सदर प्रस्ताव मंजूर करण्यात आला. यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीराम जन्मभूमि न्यासाच्या अध्यक्षांना पत्र पाठवण्यात आले.