स्टेशनवर आयोजित करा विवाह सोहळा आणि अन्य समारंभ

By admin | Published: December 29, 2016 12:51 AM2016-12-29T00:51:13+5:302016-12-29T00:51:13+5:30

रेल्वे स्टेशन म्हणताच, डोळ्यासमोर येतो तिथला गोंधळ, कलकलाट, गाड्या येताच होणारी धावपळ आणि एक विशिष्ट वास. मोठ्या शहरांमध्ये प्रत्येक प्लॅटफॉर्मवर प्रचंड

Organize wedding ceremony at the station and other ceremonies | स्टेशनवर आयोजित करा विवाह सोहळा आणि अन्य समारंभ

स्टेशनवर आयोजित करा विवाह सोहळा आणि अन्य समारंभ

Next

नवी दिल्ली : रेल्वे स्टेशन म्हणताच, डोळ्यासमोर येतो तिथला गोंधळ, कलकलाट, गाड्या येताच होणारी धावपळ आणि एक विशिष्ट वास. मोठ्या शहरांमध्ये प्रत्येक प्लॅटफॉर्मवर प्रचंड गर्दी, उभे राहायलाही नसलेली जागा आणि उपनगरी गाडी येताच त्यातून उतरण्यासाठी आणि आत शिरण्यासाठी उडणारी झुंबड. अशा रेल्वे स्टेशनवर कुणाच्या विवाह समारंभ आयोजित करावा, असा विचार आतापर्यंत कोणाच्या मनातही डोकावला नसेल. पण यापुढे रेल्वे स्टेशनवरही विवाह सोहळे आणि बँड, बाजा, बारात हे चित्र पाहायला मिळाले, तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.
प्लॅटफॉर्मवर यज्ञासमोर बसून भटजी मंत्र पुटपुटत आहेत, आंतरपाट धरून काही जण उभे आहेत, दोन्ही बाजुंना वधू-वर हातात हार धरून उभे आहेत, सात प्रदक्षिणा घेत आहेत, सात जन्म एकत्र राहण्याचे वचन एकमेकांना देत आहेत, मंगलाष्टके सुरू असताना हातात अक्षता असलेल्यांची गर्दी आणि एकमेकांना हार घालताच सुरू होणारा सनई-चौघडा आणि त्यानंतर लगेचच जेवणाच्या पहिल्याच पंगतीत बसण्यासाठी काहींची धावपळ असे चित्र रेल्वे प्लॅटर्फार्मवर पाहायला मिळू शकेल. किंबहुना विवाह सोहळ्यांसाठी रेल्वेचे प्लॅटफॉर्म देण्याची तयारी रेल्वे मंत्रालयाने सुरूही केली आहे. याच्याच तयारीला सध्या रेल्वे मंत्रालय लागले आहे. त्यामुळे आता लवकरच किमान या २00 रेल्वे स्टेशनवर मंगलाष्टके आणि सनई चौघडे ऐकू येण्याची शक्यता आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

- नोव्हेंबरमध्ये झालेल्या रेल्वे विकास शिबिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वे अधिकाऱ्यांशी रेल्वेचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यासंदर्भात चर्चा केली होती. तसेच काही सल्लेही दिले होते. त्यातूनच रेल्वेने आपले उत्पन्न वाढवण्यासाठी स्टेशनचा वापर लग्नकार्य किंवा अन्य सोहळ्यांसाठी देण्याचा विचार करावा, अशी कल्पना समोर आली.

२00 स्टेशन मोकळीच!
- रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, देशात जवळपास आठ हजार रेल्वे स्टेशन्स आहेत. यापैकी किमान २00 स्टेशनवर दिवसातून एक वा दोन गाड्याच येतात वा तिथे थांबतात.
या स्टेशनवर प्लॅटफॉर्मशिवाय बरीच जागा उपलब्ध असून, तिचा क्वचितच वापर केला जातो. या स्टेशनकडून रेल्वेला फारसे उत्पन्नही मिळत नाही. त्यामुळे ही रेल्वो स्टेशन नफ्यात आणण्यासाठी त्यांचे प्लॅटफॉर्म लग्नकार्य आणि अन्य सोहळ्यांसाठी देण्याच्या कल्पनेवर रेल्वे विचार करत आहे.
यातील काही रेल्वे स्टेशन ग्रामीण भागात आहेत. तिथे सहजच या स्टेशनचा वापर लग्नकार्य किंवा अन्य कार्यक्रमांसाठी करता येईल, असे केल्यामुळे रेल्वेचे उत्पन्न होईल आणि दुसरीकडे लोकांना चांगली सुविधाही मिळू शकेल, असे रेल्वे अधिकाऱ्यांना वाटत आहे.

Web Title: Organize wedding ceremony at the station and other ceremonies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.