कर्नाटकात अनाथ पोरगा आमदार झाला, डॉ. बाबासाहेबांचा फोटो घेऊन जल्लोष केला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2023 08:55 AM2023-05-16T08:55:10+5:302023-05-16T08:57:25+5:30
कर्नाटकमध्ये ३८ वर्षीय प्रदीप ईश्वर यांनी कर्नाटकचे आरोग्यमंत्री के. सुधाकर यांचा पराभव करत विजय मिळवला.
मुंबई - कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने १३५ जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता स्थापन केली आहे. काँग्रेसच्या या विजयाची देशभर चर्चा होत असून खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही काँग्रेसच्या या विजयाबद्दल अभिनंदन केलं आहे. या निवडणुकी काँग्रेसची स्थानिक रणनिती आणि प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांच्यासह पक्षातील सर्वच कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत फळाला आली. या विजयामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीतही उत्साह वाढला असून आता मिशन महाराष्ट्र सुरू झालं आहे. कर्नाटकमधील निवडणुकांनंतर आता कोण होणार मुख्यमंत्री याची चर्चा रंगली आहे. मात्र, कर्नाटकमधील १३५ आमदारांपैकी एक असलेल्या प्रदीप ईश्वर यांच्या विजयाचीही राज्यात चर्चा होत आहे. कारण, एका अनाथ मुलाने विद्यमान आरोग्यमंत्र्यांचा पराभव करत निवडणूक जिंकली आहे.
कर्नाटकमध्ये ३८ वर्षीय प्रदीप ईश्वर यांनी कर्नाटकचे आरोग्यमंत्री के. सुधाकर यांचा पराभव करत विजय मिळवला. या विजयामुळे ते कर्नाटक काँग्रेसमधील सर्वात तरुण आमदार बनले आहेत. चिक्काबल्लापूर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी हा विजय मिळवला. काँग्रेस पक्षाला दक्षिण भारतात, विशेषत: कर्नाटकात मोठा जनाधार आहे. माझ्यासारख्या एका गरीब कुटुंबातील अनाथ मुलाला काँग्रसने आमदारकीचं तिकीट दिलं. कुठलेही पैसे न खर्च करता मी जिंकूनही आलो, यावरुनच आजही लोकशाही जिवंत असल्याचे दिसून येते. मी काँग्रेस पक्षाला धन्यवाद देतो,असे प्रदीप ईश्वर यांनी विजयानंतर प्रतिक्रिया देताना म्हटलं.
#WATCH | Congress party has a strong base in South India especially in Karnataka. Being an orphan kid, from a poor family, the Congress Party offered me a ticket. Without any money, I won the election. It shows that democracy is still alive. I would like to thank the Congress… pic.twitter.com/PSXhL6YJvV
— ANI (@ANI) May 13, 2023
भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री बोम्मई यांच्या खास लिस्टमधील मंत्री म्हणून के. सुधाकर यांचं नाव घेतलं जात. मात्र, कोचिंग क्लासेचचा संचालक असलेल्या प्रदीप ईश्वरने त्यांना चिक्काबल्लापूर मतदारसंघातून १०, ६४२ मतांनी पराभूत केले. विशेष म्हणजे विजयी जल्लोष साजरा करताना हातात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो घेऊन आनंद व्यक्त केला. तसेच, लोकशाही जिवंत असून बाबासाहेबांमुळेच आज एक अनाथ मुलगा आमदार झाल्याचं ईश्वर यांनी म्हटले.
ईश्वर हे परिश्रम एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड चालवतात. जे मेडिकल आणि दुसऱ्या प्रवेश परीक्षांसाठी कोचिंग देतात. ईश्वरची पत्नीही त्याच कोचिंगमध्ये शिकवण्याचं काम करते. निवडणूक प्रचारावेळी ईश्वर यांची भाषणातील आक्रमक शैली मतदारांना भावली. मी एक अनाथ मुलगा आहे, या निवडणुकीत डॉक्टर जिंकतो कि डॉक्टरांना शिकवणारा शिक्षक जिंकतो, असे म्हणत त्यांनी प्रचारात आघाडी घेतली होती. त्यांचं हे भाषण चांगलंच व्हायरलही झालं होतं.
राजकारणात एँट्री
ईश्वर हे २०१६ मध्ये एका विरोध प्रदर्शनातील आंदोलनातून चर्चेत आले. ज्यामध्ये, विजिपुराला तालुका घोषित करण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानंतर, २०१७ मध्ये एका स्थानिक टेलिव्हीजनचा अँकर बनून त्यांनी लोकप्रियता मिळवली होती. त्यानंतर, सुधाकर यांच्याविरुद्ध भूमिका मांडता युट्यूबवर १ ते २ मिनिटांचे लहान-सहान व्हिडिओ अपलोड करायला त्यांनी सुरुवात केली होती. याच व्हिडिओमुळे काँग्रेस नेतृत्त्वाने त्यांच्याकडे लक्ष दिले आणि यंदाच्या निवडणुकीत चिक्काबल्लापूर मतदारसंघातून निवडणुकीचे तिकीटही दिले. काँग्रेसचा हा निर्णय योग्य सिद्ध करुन दाखवत प्रदीप ईश्वर आता विधानसभेत पोहोचले आहेत.