ओसामा बिन लादेन होता कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांचा चाहता, अमेरिकेने उघड केला 'खजाना'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2017 01:58 PM2017-11-03T13:58:21+5:302017-11-03T17:20:24+5:30
ओसामा बिन लादेनच्या घरी सापडलेल्या कॉम्प्युटरमध्ये नारायण, कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या गाण्यांचा साठा आहे.
मुंबई - आपल्याकडे उदित नारायण, कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांचा एक मोठा चाहतावर्ग आहे. 90 च्या दशकात यांच्या गाण्यांनी लोकांना अक्षरक्ष: वेड लावलं होतं. आजही त्यांची गाणीही तितकीच प्रसिद्ध आहेत. त्यांच्या चाहत्यांच्या यादीत एक नाव असं आहे जे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. ते नाव आहे दहशतवादी ओसामा बिन लादेन. ओसामा बिन लादेनच्या घरी सापडलेल्या कॉम्प्युटरमध्ये नारायण, कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या गाण्यांचा साठा आहे.
मे 2011 मध्ये पाकिस्तानच्या ऐबटाबादमध्ये लपून बसलेल्या अल-कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेन याला अमेरिकेच्या सैन्यांनी ठार केलं होतं. ओसामा राहायचा त्याठिकाणी अमेरिकी कमांडोजना अनेक कॉम्प्युटर सापडले आहेत. अमेरिकेची गुप्तचर संघटना सीआयएने बुधवारी या कॉम्प्युटरमध्ये असणा-या जवळपास चार लाख 70 हजार फाईल्सना सार्वजनिक केलं आहे. एकेकाळी क्रूर दहशतवादी म्हणून ओळख असणा-या ओसामा बिन लादेनच्या कॉम्प्युटरमध्ये आत्मघाती हल्ल्यांसोबत अनेक हत्यांचे व्हिडीओ सापडले आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे लादेनकडे उदित नारायण, कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांची हिंदी गाणीही सापडली. लादेनच्या कॉम्प्युटरमध्ये 2010 मध्ये दिल्लीत झालेल्या हॉकी सामन्याच्या सुरक्षेचा रिपोर्टही आहे.
अमेरिकेवर 9/11 ला झालेल्या आतंकवादी हल्ल्याच्या मागे क्रूर दहशतवादी लादेनचाच हात होता. यानंतर अमेरिकेने लादेनचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. जवळपास 10 वर्षानंतर ओसामा पाकिस्तानमधील एका घरात राहत असल्याचं समोर आलं होतं. 2 मे 2011 ला ओसामा बिन लादेनचा अमेरिकेच्या लष्कराने पाकिस्तानच्या ऐबटाबाद येथील त्याच्या घरात घुसून खात्मा केला होता. हे संपूर्ण ऑपरेशन अमेरिकेच्या नेव्ही सील कमांडोंनी यशस्वीरीत्या पार पाडले होते.
ओसामाच्या ठिकाणावरुन सीआयएला जवळपास 18 हजार कागदपत्रांची फाईल, 80 हजार ऑडिओ आणि इमेज फाईल सापडल्या होत्या. याशिवाय लादेनकडे अजय देवगन आणि काजोलच्या 'प्यार तो होना ही था' चित्रपटातील 'अजनबी मुझको इतना बता', सलमान खान आणि माधुरी दिक्षितच्या 'दिला तेरा आशिक' चित्रपटाचं टायटल साँगही सापडलं आहे. तसंच 'टॉम अॅण्ड जेरी' कार्टूनही कॉम्प्युटरमध्ये सापडलं आहे. इंग्रजी शिकण्याचे व्हिडीओ त्यात सामील आहेत.