अधिकृत ट्रस्टशिवाय इतर ट्रस्टना रामलल्लाच्या नावे दान किंवा वर्गणी गोळा करण्यास मज्जाव
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2020 08:43 AM2020-02-22T08:43:13+5:302020-02-22T08:49:36+5:30
रामलल्लाच्या नावे मंदिर निर्माणासाठी अधिकृत ट्रस्टशिवाय इतर कोणत्याही ट्रस्ट किंवा संस्था वर्गणी, दान किंवा अनुदान घेऊ शकत नाही.
नवी दिल्लीः रामलल्लाच्या नावे मंदिर निर्माणासाठी अधिकृत ट्रस्टशिवाय इतर कोणत्याही ट्रस्ट किंवा संस्था वर्गणी, दान किंवा अनुदान घेऊ शकत नाही. श्रीरामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र बोर्डाच्या बैठकीनंतर केंद्रीय गृहमंत्रालयानं ही मार्गदर्शक सूचना सर्वच राज्यांना जारी केली आहे. राममंदिर निर्माणासाठी 1984मध्ये पहिल्यांदा श्रीरामजन्मभूमी मुक्ती यज्ञ समिती गोरक्षपीठाश्वर महंत अवैद्यनाथजी यांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आली होती. वर्षभरानंतर जगद्गुरू रामानंदाचार्य स्वामी शिवरामाचार्यजी यांच्या अध्यक्षतेखाली ऑक्टोबर 1985मध्ये श्रीरामजन्मभूमी न्यासाची स्थापना झाली.
स्वामी शिवरामाचार्यजी यांचं 1989ला देहवसान झाल्यानंतर महंत परमहंस रामचंद्र दास यांच्याकडे संस्थेचं अध्यक्षपद आले. या ट्रस्टनं आतापर्यंत जवळपास 20 कोटी रोख, भू-इमारती, मंदिर बांधकामाच्या दगडांसह बांधकाम साहित्य जमा केल्याची माहिती समोर आली आहे. महंत नृत्यगोपाल दास हे सध्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. बाबरी मशीद पाडल्यानंतर तात्काळ तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या प्रयत्नांनी ज्योतिष पीठाधीश्वर व द्वारिकाशारदा पीठाधीश्वर जगद्गुरू शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्या अध्यक्षतेखाली 1993मध्ये अयोध्या श्रीराम जन्मभूमी रामालय न्यास स्थापन झाला. अयोध्या ऍक्ट आणून याच ट्रस्टला राममंदिराच्या पुनर्निर्माणांचं काय सोपवण्याची तत्कालीन सरकारनं तयारी चालवली होती. तिसरी ट्रस्ट श्रीरामजन्मभूमी मंदिर निर्माण न्यास आहे. त्या ट्रस्टलाही रामलल्लांचं मंदिर तयार करण्यासाठी कोट्यवधींची वर्गणी आणि दान मिळालेलं आहे.
नवी ट्रस्ट स्थापन झाल्यानंतरही रामालयानं सोन्याचा संग्रह या अभियानांतर्गत देशातील सात हजार गावांमधून एक हजार किलो सोनं जमवून भव्य मंदिर तयार करण्याचं काम 7 फेब्रुवारी 2020लाच सुरू केलं आहे. या अभियानाविरोधात डीएम अनुजकुमार झा यांनी सरकारला एक अहवाल पाठवला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नवी दिल्लीत 19 फेब्रुवारीला झालेल्या श्रीराम जन्मभूमी ट्रस्टच्या पहिल्या बैठकीनंतर अध्यक्ष बनलेल्या महंत नृत्यगोपाल दास आणि महासचिव चंपत राय यांनी स्वतः इतर ट्रस्टला दान-वर्गणी स्वीकारण्यास आक्षेप नोंदवला आहे. त्यानंतर केंद्रानं कडक पावलं उचलत सर्व राज्यांना मार्गदर्शक सूचना जारी केली आहे.