...अन्यथा भरचौकात फासावर लटकेन; केजरीवालांना गंभीरचे तिसरे चॅलेंज
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 04:18 PM2019-05-10T16:18:53+5:302019-05-10T16:28:11+5:30
गंभीरवर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचा इशारा अरविंद केजरीवाल यांनी दिला आहे.
नवी दिल्ली : एरव्ही परदेशी क्रिकेटपटूंना सोशल मिडीयावरून प्रत्युत्तर देत प्रसिद्धीच्या झोतात असलेला माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. मात्र, भाजपात प्रवेश केल्यापासून सोशल मिडीयावर टीकेचा धनी ठरत आहे. आपच्या उमेदवार आतिशी मार्लेना यांच्याबाबतची आक्षेपार्ह पत्रके वाटल्यावरून टीका होत असताना गंभीरने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तिसरे चॅलेंज दिले आहे. यामध्ये त्याने लोकांसमोर स्वत:ला फाशी लावून घेणार असल्याचे सांगितले आहे.
पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातून भाजपानेगौतम गंभीरला निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. तर त्याच्या विरोधात आपकडून आतिशी मार्लेना या उभ्या राहिल्या आहेत. आतिशींनी गौतम गंभीरवर गेल्या काही दिवसांत गंभीर आरोप केले आहेत. यामध्ये गौतम गंभीरकडे दोन मतदान ओळखपत्रे असल्याचा दावाही करताना त्याच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल झालेली आहे. तसेच प्रचार पत्रकांवर पत्रकांची संख्या आणि मुद्रकाचे नाव न छापल्याचाही गुव्हा दाखल झालेला आहे. यापेक्षा गंभीर आरोप त्याच्यावर आतिशी यांनी गुरुवारी केला आहे.
मतदासंघातल्या काही ठिकाणी आतिशी यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर असलेली पत्रकं वाटण्यात आली. यामागे भाजपा आणि गौतम गंभीर असल्याचा आरोप मार्लेना यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये केला. गंभीर एखाद्या सशक्त महिलेविरोधात अशा प्रकारची पत्रकं वाटू शकतात. तर ते महिलांना काय सुरक्षा देणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांना पत्रकातील मजकूर वाचून दाखवत असताना रडू कोसळले होते. या प्रकरणी आपच्या उमेदवार आतिशी यांनी दिल्ली महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी गंभीरविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.
यावर केजरीवाल यांनी आतिशी एवढ्या चांगल्या शिकलेल्या उमेदवार असताना आणि त्यांनी शिक्षणासाठी एवढे चांगले काम केलेले असताना भाजपा आणि त्यांच्या उमेदवार गौतम गंभीर असले कृत्य करेल असे वाटले नव्हते. गंभीरवर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. यावर गौतम गंभीरने ट्विट करत केजरीवाल यांच्यासारखा घाणेरडा मुख्यमंत्री पाहिला नसल्याचे म्हटले होते. या प्रकरणी त्याने गेल्या काही दिवसांपासून केजरीवाल यांना दोन चॅलेंज दिली होती. यामध्ये उमेदवारी मागे घेण्याचेही म्हटले होते. आज त्याने फासावर लटकण्याचा इशाराच दिला आहे.
Delhi CM Arvind Kejriwal: Atishi (AAP East Delhi candidate) is a highly educated and an accomplished woman. Her work has been great in the field of education which is being discussed worldwide. I don't understand why BJP can't tolerate achievements made by women. pic.twitter.com/GSa9zUdsGE
— ANI (@ANI) May 10, 2019
आतिशी यांच्याबाबत मी जर असा प्रकार केला हे जर केजरीवाल आणि आपने सिद्ध केल्यास लोकांच्यासमोर स्वत:ला फाशी लावून घेणार असल्याचे ट्विट त्याने केले आहे. तसेच जर केजरीवाल अपयशी ठरले तर त्यांनी राजकारण सोडावे, असे आव्हानही दिले आहे.
Challenger Number 3 to @ArvindKejriwal and @aap. If he can prove that I have anything to do with this pamphlet filth, then I will hang myself in public. Otherwise @ArvindKejriwal should quit politics. Accepted?
— Chowkidar Gautam Gambhir (@GautamGambhir) May 10, 2019