... अन्यथा रामायण बंगल्यासमोरच खड्डे करू, राष्ट्रवादीचा गर्भीत इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 05:01 PM2021-10-13T17:01:22+5:302021-10-13T17:02:16+5:30
युवक राष्ट्रवादीच्यावतीने महापालिका सत्ताधारी व प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनदेखील रस्त्यांची दुरुस्ती न झाल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसने शहरातील खड्ड्यांचे श्राद्ध घालत गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले.
नाशिक - रस्त्यातील खड्डे हा विषय महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यातील गंभीर समस्या बनली आहे. त्याला नाशिकही अपवाद नाही. त्यामुळेच, नाशिककर या रस्त्यांमधील खड्ड्यांना चांगलंच वैतागले आहेत. त्यातूनच युवक राष्ट्रवादीने रामायण बंगल्यासमोरच खड्डे पाडण्याचा गर्भीत इशारा दिला आहे. नाशिक शहरातील सर्व खड्डे पुढील पंधरा दिवसात बुजवा अन्यथा रामायण बंगला, स्थायी समिती सभापती व सत्ताधारी नगरसेवकांच्या घरासमोर खड्डे करू असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी महापालिका सत्ताधाऱ्यांना दिला.
युवक राष्ट्रवादीच्यावतीने महापालिका सत्ताधारी व प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनदेखील रस्त्यांची दुरुस्ती न झाल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसने शहरातील खड्ड्यांचे श्राद्ध घालत गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले. तरीही, सुस्त सत्ताधाऱ्यांनी याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे, महापौर, विभाग सभापती व सत्ताधारी नगरसेवक यांनी कुठलेही काम केलेले नसून यांची येत्या पंधरा दिवसात रस्त्यांवरील खड्डे न बुजविल्यास युवक राष्ट्रवादी रामायण बंगला, स्थायी समिती सभापती व सत्ताधारी नगरसेवकांच्या घरासमोर खड्डे करणार आहे. तसेच या आंदोलनानंतरही खड्डे न बुजविल्यास आंदोलनाची तीव्रता वाढवत जाणार असल्याचे युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी सांगितले.
नाशिकची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून स्मार्ट सिटीचा टेंभा मिरवणाऱ्या या शहरात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. पावसाच्या पाण्यामुळे पडलेल्या खड्ड्यांसोबत गॅस पाईपलाईन, वायरी व पावसाळी गटार या कामांसह विविध कामांच्या नावाखाली खोदलेल्या रस्त्यांमुळे नाशिककर त्रस्त झाले आहेत. शहरातील खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्याने वाहनधारकांना खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अपघात घडत आहे. जनतेच्या कोट्यावधी रुपयांचे रस्ते एकाच पावसात खड्डेमय झाल्याने खुद्द भाजपा आमदार यांनी ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली होती. विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नाशिकमध्ये आले असता, महापालिका प्रशासनाने शहरातील खड्ड्यात माती व मुरूम टाकून मलमपट्टी केली. पण, पावसाच्या पाण्यामुळे माती वाहून जात सर्वत्र चिखल झाला आहे.
दरम्यान, दिवाळीचा सण जवळ येत असल्याने नाशिककर खरेदीकरिता घराबाहेर पडत आहे. पण, त्यांना रस्त्यांवरील खड्ड्यांचा त्यांना प्रचंड त्रास होत असल्याने कमरेचे व मणक्याचे आजार उद्भवू लागल्याकडेही खैरे यांनी लक्ष वेधले.