आमची कोव्हॅक्सिन लस २०० टक्के सुरक्षित; सीरमचे नाव न घेता भारत बायोटेकचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2021 05:59 AM2021-01-05T05:59:42+5:302021-01-05T06:00:04+5:30
Corona Vaccination : कोव्हॅक्सिनचे दोन कोटी डोस तयार आहेत. वैद्यकीय चाचण्यांच्या दुसऱ्या टप्प्यातील निष्कर्षांच्या आधारे लसीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली जाऊ शकते, असे केंद्रीय औषध मानक नियामक मंडळाच्या मार्गदर्शक तत्त्वांत नमूद आहे.
हैदराबाद : आम्ही विकसित केलेली कोव्हॅक्सिन ही कोरोनावरील लस २०० टक्के सुरक्षित आहे. आमच्यावर कोणी संशय घेऊ शकत नाही’, असे ठाम प्रतिपादन केले आहे भारत बायोटेकचे अध्यक्ष डॉ. कृष्णा इल्ला यांनी.
कोरोनावरील उपचारासाठी औषध महानियंत्रकांनी रविवारी सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक यांच्या अनुक्रमे कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसींना मंजुरी दिली. मात्र, त्यातील कोव्हॅक्सिन लसीच्या मंजुरीवर अनेकांनी आक्षेप घेतला. कोव्हॅक्सिन लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचण्यांचे निष्कर्ष अद्याप जाहीर झाले नसताना लसीला मंजुरी कशी दिली, असा प्रश्न निर्माण उपस्थित झाला. त्यातच दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी कोव्हॅक्सिन ही पर्यायी लस असेल, असे स्पष्ट केले. या सर्व पार्श्वभूमीवर डॉ. कृष्णा इल्ला यांनी सोमवारी कंपनी आणि लसीबाबत सविस्तर भूमिका मांडली.
डॉ. इल्ला म्हणाले, ‘कमी पैशांतही आम्ही संशोधक देशात लसी विकसित करत आहोत. अन्यांनी मात्र इतर देशांनी संशोधन केलेली लस या ठिकाणी विकसित केली आहे. आमच्या तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचण्यांचे निष्कर्ष आम्ही लवकरच जाहीर करू. आम्हाला आमचा डेटा उघड करण्यासाठी १४६ बाधितांची गरज आहे. लसीचा दुसरा डोस दिल्यानंतर हा डेटा उघड करण्यासाठी काही वेळ जाऊ द्यावा लागेल. परिणामकारकतेसंदर्भातील कोणताही हंगामी डेटा अद्याप सादर करण्यात आलेला नाही. आम्ही आतापर्यंत १६ लसी विकसित केल्या असल्याने आम्हाला कोणीही अननुभवी म्हणून हिणवू नये. आमची कंपनी भारतीय असली तरी जागतिक दर्जाची आहे.’
निर्णायक लस
टायफॉइडवर आम्ही विकसित केलेली लस डब्ल्ययूएचओने निर्णायक लस म्हणून घोषित केली होती, असे सांगत डॉ. इल्ला यांनी विरोधकांचा समाचार घेतला. आमचा रेकॉर्ड उत्तम आहे. ७० जर्नल्समध्ये शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत, असे नमूद करत त्यांनी सीरमचे नाव न घेता टोला लगावला.
१०% दुष्परिणाम
कोव्हॅक्सिन लसीच्या चाचण्यांमध्ये फक्त १० टक्के लोकांमध्येच दुष्परिणाम आढळून आले. इतरांच्या चाचण्यांमध्ये ६० ते ७०% लोकांना दुष्परिणाम जाणवले. दुष्परिणाम झाकण्यासाठी ॲस्ट्राझेनेका ४ ग्रॅम पॅरासिटामॉल देत होते.
१००० जणांचा डेटा
आमच्याकडे १००० लोकांचा रोगप्रतिकार शक्तीचा डेटा उपलब्ध आहे. इतरांनी फक्त १०० लोकांचाच डेटा सादर केल्याचे डॉ. इल्ला यांनी सीरमचे नाव न घेता सांगितले. अमेरिका व युरोपात ऑक्सफर्डचा डेटा स्वीकारण्यास नकार दिला असताना आपल्याकडे त्यांची लस मंजूर झाली.
२ कोटी डोस तयार
कोव्हॅक्सिनचे दोन कोटी डोस तयार आहेत. वैद्यकीय चाचण्यांच्या दुसऱ्या टप्प्यातील निष्कर्षांच्या आधारे लसीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली जाऊ शकते, असे केंद्रीय औषध मानक नियामक मंडळाच्या मार्गदर्शक तत्त्वांत नमूद आहे.