"आमची लढाई भारत सरकारशी, तुम्ही मध्ये पडू नका, अन्यथा…’’ खलिस्तानवादी SFJची हिमंता बिस्वा सरमांना धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2023 05:04 PM2023-04-02T17:04:31+5:302023-04-02T17:06:16+5:30
SFJ's threat to Himanta Biswa Sarma: फरार असलेल्या अमृतपालच्या काही सहकाऱ्यांना आसाममधील तुरुंगात ठेवण्यात आलं आहे. या कारवाईमुळे खलिस्तानी संतप्त झाले असून त्यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांना धमकी दिली आहे
उघडपणे खलिस्तानची मागणी करून पंचाबमधील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अमृतपालसिंग विरोधात पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांनी आघाडी उघडली आहे. दरम्यान, सध्या फरार असलेल्या अमृतपालच्या काही सहकाऱ्यांना आसाममधील तुरुंगात ठेवण्यात आलं आहे. या कारवाईमुळे खलिस्तानी संतप्त झाले असून त्यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांना धमकी दिली आहे. शीख फॉर जस्टिसच्या गुरपतवंत सिंग पन्नू याने ही धमकी दिली आहे.
गुरपतवंत सिंग पन्नूची संघटना शीख फॉर जस्टिरच्या लोकांनी त्यांना खलिस्तान आणि अमृतपाल सिंग प्रकरणापासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे. खलिस्तान समर्थकांची लढाई ही भारत सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींशी आहे. त्यामुळे आसामच्या मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात पडून हिंसेची शिकार होऊ नये.
हिमंता बिस्वा सरमा यांना धमकी देण्यासाठी आसाममधील सुमारे १२ पत्रकारांना फोन करण्यात आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने स्वत:ची ओळख एसजेएफचा सदस्य म्हणून करून दिली. त्याने हेही सांगितले की, खलिस्तान समर्थकांची लढाई ही भारत सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आहे. त्यामुळे आसामच्या मुख्यमंत्र्यांनी या वादात पडू नये.
फुटीरतावाद्यांनी हेही सांगितले की, जर आसामन सरकार पंजाबमधून आसाममध्ये घेऊन गेलेल्या अमृतपाल याच्या समर्थकांना त्रास देण्याचा विचार करत असेल तर त्यासाठी हिमंता बिस्वा सरमा जबाबदार असतील. एसएफजे ही संघटना सार्वमत घेऊन पंजाब भारतापासून वेगळे करण्याचा प्रयत्नात आहे.
२१ मार्च रोजी अमृतपाल सिंगचे काका हरजित सिंग आणि ड्रायव्हर हरप्रीत सिंग यांनी आत्मसमर्पण केलं होतं. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक करून आसममधील डिब्रुगड सेंट्रल जेलमध्ये पाठवले होते. आसाम पोलिसांच्या सुरक्षेखाली त्यांची टीम गुवाहाटीमधील डिब्रुगड येथे पोहोचली होती.