आमच्या सरकारने प्रत्येक मुस्लीम कुटुंबाला संरक्षण दिले - नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2024 03:11 PM2024-04-05T15:11:03+5:302024-04-05T15:14:04+5:30
Lok Sabha Elections 2024: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजस्थानच्या चुरूमध्ये शुक्रवारी नरेंद्र मोदी जनतेला संबोधित केले.
काँग्रेसने जनतेसाठी काम केले नाही तर केवळ कुटुंबासाठी काम केले आहे. आम्ही सातत्याने लोकांसाठी काम करत आहोत, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. तसेच, आमच्या सरकारने प्रत्येक मुस्लीम कुटुंबाला संरक्षण दिल्याचा दावा नरेंद्र मोदी यांनी यावेळी केला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजस्थानच्या चुरूमध्ये शुक्रवारी नरेंद्र मोदी जनतेला संबोधित केले.
नरेंद्र मोदी म्हणाले, "तिहेरी तलाकमुळे मुस्लीम मुलींच्या डोक्यावर टांगती तलवार होती. ती दूर करून प्रत्येक मुस्लीम कुटुंबाला संरक्षण दिले आहे. एका मुस्लीम कुटुंबातील वडिलांना वाटले की, त्यांनी लग्न करून आपल्या मुलीला पाठवले आहे, पण दोन ते तीन मुलांना जन्म दिल्यावर मुलीला तिहेरी तलाक देऊन परत पाठवले तर काय होईल. आई, मुलगी, भाऊ सगळेच काळजीत पडले होते. मोदींनी सर्व मुस्लिम कुटुंबांचे प्राण वाचवले आहेत."
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवरही हल्लाबोल करत लूट आणि घोटाळ्यांमुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडली असल्याचे सांगितले. पूर्वी सरकारमध्ये बसलेले लोक गरिबांचे पैसे खात असत. 10 वर्षांपूर्वी देशात अराजकतेची परिस्थिती होती. आमच्या सरकारने ती योग्य केल्याचे नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच, भाजपा प्रत्येक स्तरावर जनतेच्या पाठीशी उभा आहे. जे काम अनेक दशकांत झाले नाही ते आम्ही केले आहे. गेल्या दहा वर्षांत कितीही काम झाले, तरी मी माझ्या भावना चुरूमध्ये व्यक्त करतो. सध्या जे काही घडले ते फक्त ट्रेलर आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
याचबरोबर, देशाला खूप पुढे न्यायचे आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच, देशात नरेंद्र मोदींच्या हमीभावाची चर्चा होत आहे. भाजपा सर्वकाही करते. आम्ही जाहीरनामा देत नाही तर संकल्प पत्र जारी करतो. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या संकल्प पत्रात दिलेली बहुतांश आश्वासने आम्ही पूर्ण केली आहेत, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.