काँग्रेसच्या संघर्षापेक्षाही आमचा संघर्ष मोठा- मोदी
By admin | Published: August 19, 2016 06:17 AM2016-08-19T06:17:31+5:302016-08-19T06:17:31+5:30
ब्रिटीश शासनाच्या काळात काँग्रेसला जेवढा संघर्ष करावा लागला नाही त्यापेक्षा अधिक संकटांचा सामना आम्ही स्वातंत्र्य भारतात केला, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली : ब्रिटीश शासनाच्या काळात काँग्रेसला जेवढा संघर्ष करावा लागला नाही त्यापेक्षा अधिक संकटांचा सामना आम्ही स्वातंत्र्य भारतात केला, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी येथे व्यक्त केले. भाजपच्या नव्या मुख्यालयाच्या भूमीपूजनप्रसंगी ते बोलत होते.
भाजपच्या प्रत्येक कृती, प्रयत्नाला चुकीच्या पद्धतीने बघितले जाते, याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली. मोदी म्हणाले की, भाजपने कोणत्याही अन्य पक्षापेक्षा अधिक बलिदान केले आहे. देशाची ताकद वाढत असताना फुटीरवादी गट अधिक सक्रीय झाले आहेत.
‘सब का साथ, सब का विकास’ हा आपला उद्देश असल्याचे सांगून ते म्हणाले की, पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हा संदेश सर्वदूर पोहचवायला हवा की, पक्ष कशाप्रकारे आदर्शाचे पालन करत आहे. कारण, हे जग या पक्षाला भगव्या संघटनेच्या रुपात बघते त्यामागे फक्त ऐकीव गोष्टी आहेत.
पक्षाध्यक्ष अमित शहा, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, राजनाथ सिंह, अरूण जेटली आदी प्रमुख नेत्यांची यावेळी उपस्थिती होती. मोदी म्हणाले की, ब्रिटीशकाळात काँग्रेसने केलेल्या संघर्षापेक्षा अधिक संघर्ष आमच्या कार्यकर्त्यांनी या ५० ते ६० वर्षात केला आहे. आमचे अनेक कार्यकर्ते आतापर्यंत मारले गेले. कारण, ते त्या काळातील विचारांशी सुसंगत चालत नव्हते. पक्षाची सदस्यसंख्या ११ कोटींपेक्षा अधिक झाल्याचे त्यांनी सांगितले. सामान्य कार्यकर्त्यांमुळेच आज पक्षाची प्रगती दिसत आहे. पक्ष कार्यकर्त्यांच्या घामाचा सुगंध या नव्या इमारतीत दरवळत राहिल, असेही ते म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
असे असेल मुख्यालय
या सात मजली भव्य इमारतीमध्ये एका बाजूला तीन मजली कॉम्प्लेक्स असेल. मुख्य इमारतीत ७० खोल्या असतील. यात तीन कॉन्फरन्स हॉल असतील. आतील पूर्ण भाग हा वाय फायने सुसज्ज असेल.
१५० कारसाठी येथे अत्याधुनिक भूमीगत पार्किंगची व्यवस्था असेल. तर या परिसरात जल पुनर्भरणाचीही व्यवस्था असेल. याशिवाय सोलर पॉवर सिस्टीमही कार्यान्वित करण्यात येईल.
या परिसरातील ७० टक्के भाग हरित क्षेत्र म्हणून विकसित करण्यात येणार आहे. जिल्ह्यातून येणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांना येथील डिजिटल लायब्ररीचा उपयोग करता येईल. ३ डीचा हॉल हे खास आकर्षण असेल.
हे कार्यालय भव्य आणि अत्याधुनिक करण्यावर पक्षाचा भर आहे.
मध्य दिल्लीत होणार मुख्यालय
- भाजपाचे नवे मुख्यालय दीनदयाळ उपाध्याय मार्गावर असेल. पुढील निवडणुकीपूर्वी म्हणजे २०१८ मध्ये या वास्तूत प्रवेश करण्यात येणार आहे. डिजिटल लायब्ररीसारखे विभाग या कार्यालयाचे वेगळेपण अधोरेखित करणारे असतील.
- मध्य दिल्लीत दीनदयाल उपाध्याय मार्गावर हे मुख्यालय असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमीत शहा यांच्या हस्ते येथे गुरुवारी भूमीपूजन करण्यात आले. ८००० वर्ग फुटाच्या भव्य जागेत हे कार्यालय बांधण्यात येणार आहे.
- या योजनेशी संबंधित एका भाजप पदाधिकाऱ्याने सांगितले की, अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसाला २५ डिसेंबर २०१८ पर्यंत या कार्यालयाचे काम पूर्ण झालेले असेल. त्या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. आमच्याकडे दोन वर्षांचा कालावधी आहे.