मोदी सरकारच्या तुलनेत आमचे काम दसपट , केजरीवालांचे अमित शहांना खुल्या चर्चेचे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 05:24 AM2018-09-24T05:24:00+5:302018-09-24T05:24:20+5:30
भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी पूर्वांचलच्या विकासासाठी सरकारने काय केले याचा हिशेब रामलीला मैदानावरील पूर्वांचल महाकुंभामध्ये मांडला. अरविंद केजरीवाल यांनी अमित शहांच्या या दाव्यांना दिल्लीच्या राजकारणाशी जोडले आहे.
नवी दिल्ली - भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी पूर्वांचलच्या विकासासाठी सरकारने काय केले याचा हिशेब रामलीला मैदानावरील पूर्वांचल महाकुंभामध्ये मांडला. अरविंद केजरीवाल यांनी अमित शहांच्या या दाव्यांना दिल्लीच्या राजकारणाशी जोडले आहे.
काँग्रेस सरकारने १३ व्या वित्त आयोगाच्या अंतर्गत पूर्वांचलच्या विकासासाठी केवळ ४ लाख कोटी रुपयांचा निधी दिला होता. मोदी सरकारने मात्र १४ व्या वित्त आयोगाच्या अंतर्गत ही रक्कम जवळपास तिप्पट करुन १३ लाख ८० हजार कोटी रुपयांचा निधी पूर्वांचलसाठी दिला. याच मुद्याचा आधार घेत १४ व्या वित्त आयोगांतर्गत दिल्लीला केवळ ३२५ कोटी रुपयांचा निधी का दिला, असा प्रश्न केजरीवाल यांनी अमित शहांना विचारला. दिल्लीमधेही पूर्वांचलचे लोक राहतात. मग त्यांच्या विकासासाठी पैसे का नाही देत? दिल्लीमध्ये राहणाऱ्या पूर्वांचलच्या लोकांसोबत भेदभाव का, असा प्रश्नही केजरीवाल यांनी टिष्ट्वटरवरुन विचारला.
केजरीवाल केवळ इथेच थांबले नाहीत, तर गेल्या चार वर्षांत मोदी सरकारने केलेली कामे आणि दिल्ली सरकारने केलेली कामे यांची तुलना करणारी चर्चा रामलीला मैदानावर होऊन जाऊ दे, असे आव्हानही त्यांनी भाजप अध्यक्षांना दिले. पूर्वांचल महाकुंभच्या निमित्ताने अमित शाह यांच्या एका विधानाच्या हवाल्याने भाजपच्या टिष्ट्वटर हँडलवरुन केलेल्या एका टिष्ट्वटचा संदर्भ या आव्हानाला होता.
‘केजरीवालजी, या चार वर्षांत तुम्ही दिल्लीकरांसाठी काय काम केले? दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा एकच मूलमंत्र आहे. खोटे बोलणे आणि वारंवार रेटून खोटे बोलणे,’ असे टिष्ट्वट भाजपने केले होते. त्याला प्रत्युत्तर देताना केजरीवालांनी आरोग्य, शिक्षण, वीज-पाणी या क्षेत्रात आप सरकारने केलेल्या मूलभूत कामांचा दाखला दिला. या कामांची प्रशंसा जागतिक स्तरावरही होत असल्याचे त्यांनी म्हटले. मोदींनी जेवढे काम चार वर्षांत केले, त्याच्या दसपट काम आम्ही केले आहे. आमच्याकडून एकही चुकीचे काम झाले नाही असा विश्वास व्यक्त करून केजरीवालांनी रामलीला मैदानावर या संदर्भात दिल्लीकरांसोबत एक खुली चर्चा होऊ दे असे आव्हान भाजपला दिले.
दिल्लीमध्ये असलेली पूर्वांचलच्या मतदारांची संख्या लक्षात घेऊन लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने भाजपने ‘पूर्वांचल महाकुंभ’चे आयोजन केले होते. केजरीवालांनाही या मतदारांना डोळ्यांसमोर ठेवून आपल्या पक्षाचीही भूमिका टिष्ट्वटरच्या माध्यमातून मांडली.