भाविकांकडून पैसे घेणा-या २४३ नाभिकांची हकालपट्टी, तिरुपती देवस्थानची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 02:03 AM2017-10-16T02:03:52+5:302017-10-16T05:52:51+5:30

मुंडण करण्याच्या बदल्यात भाविकांकडून पैसे घेण्याच्या आरोपावरून आंध्र प्रदेशमधील प्रसिद्ध तिरुमला देवस्थानने तब्बल २४३ नाभिकांना सेवेतून बडतर्फ केले आहे. मंदिर प्रशासनाची ही कारवाई अन्याय्य असल्याने ती मागे घेऊन पुन्हा कामावर घेतले जावे....

 Out of 243 nuclei extracting money from devotees, Tirupati Devasthan | भाविकांकडून पैसे घेणा-या २४३ नाभिकांची हकालपट्टी, तिरुपती देवस्थानची कारवाई

भाविकांकडून पैसे घेणा-या २४३ नाभिकांची हकालपट्टी, तिरुपती देवस्थानची कारवाई

Next

तिरुपती : मुंडण करण्याच्या बदल्यात भाविकांकडून पैसे घेण्याच्या आरोपावरून आंध्र प्रदेशमधील प्रसिद्ध तिरुमला देवस्थानने तब्बल २४३ नाभिकांना सेवेतून बडतर्फ केले आहे. मंदिर प्रशासनाची ही कारवाई अन्याय्य असल्याने ती मागे घेऊन पुन्हा कामावर घेतले जावे, यासाठी या नाभिकांनी शनिवारी मंदिराबाहेर निदर्शने केली.
चित्तूर जिल्ह्यातील तिरुमला तिरुपती देवस्थान हे देशातील सर्वात श्रीमंत देवस्थान म्हणून ओळखले जाते. या मंदिरात दररोज सरासरी ६० ते ७० हजार भाविक तिरुपती बालाजीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात. शनिवार, रविवार आणि सुट्ट्यांच्या दिवशी ही संख्या एक लाखापर्यंत पोहोचते. यापैकी किमान ७० टक्के भाविक दर्शनाच्या आधी डोक्याचे मुंडण करून घेतात व केस भगवान व्यंकटेश्वराला अर्पण करतात.
मंदिर परिसरात कल्याण कट्टा येथे अतिप्रशस्त असे केशकर्तनालय असून तेथे भाविकांच्या मुंडणाची अहोरात्र सोय विनामूल्य आहे. यासाठी ९४३ नाभिक नेमले असून, बहुतांश कंत्राटी आहेत. खास उत्सवांच्या वेळी महिला नाभिकही नेमले जातात. प्रशासन प्रत्येक मुंडणासाठी १० रुपये या दराने नाभिकांना मेहताना देते.

सीसीटीव्हीत आढळले टीप घेण्याचे प्रकार
अनेक नाभिक मुंडण करून झाल्यावर भाविकांकडून १० ते ५० रुपये ‘टिप’ म्हणून घेतात, अशा तक्रारी आल्या होत्या.
या तक्रारींची मंदिराच्या
दक्षता व सुरक्षा शाखेकडून
कसून तपासणी केली गेली.
जोडीला कल्याण मंडपमध्ये बसविलेल्या ‘क्लोज्ड सर्किट’ टीव्हीच्या फुटेजचाही आधार घेण्यात आला.

आम्हाला परत घ्या : भाविकांच्या तक्रारींवरून यापूवीर्ही काही नाभिकांना कामावरून काढून टाकण्याची कारवाई केली गेली होती, परंतु एवढ्या मोठ्या संख्येने नाभिकांना एकदम घरी बसविणे हे प्रथमच घडले आहे. निदर्शने करणाºया भाविकांनी आमच्या चरितार्थाचे हेच एकमेव साधन असल्याने निदान मानवता म्हणून तरी कामावर पुन्हा घ्यावे, अशी विनंती केली.

या आधी ३ वेळा ताकीद
देवस्थान प्रशासनाचे अधिकृत प्रवक्ते टी. रवी यांनी सांगितले की, हे नाभिक मंदिर प्रशासनाच्या नियमित सेवेत नाहीत. माणशी १० रुपये अशा सरसकट दराने मुंडण करण्यासाठी त्यांना ‘आउटसोर्सिंग’ पद्धतीने कामावर ठेवण्यात आले होते. या आधीही त्यांना तीन वेळा ताकीद देण्यात आली होती. तरीही त्यांनी भाविकांकडून पैसे घेणे सुरूच ठेवल्याने ‘लाच’ घेतल्याबद्दल त्यांना कामावरून दूर केले गेले.
भाविकच स्वत:हून पैसे देतात
आम्ही ‘लाच’ घेतो किंवा सक्तीने पैसे उकळतो, हा आरोप बरोबर नाही. भाविक आम्हाला स्वत:हून पैसे देतात. याला लाच किंवा सक्ती म्हणता येणार नाही, असे नाभिकांनी म्हटले.

मंदिराला १५० कोटींचे उत्पन्न
नाभिकांना आंघोळ करून येण्यासह स्वच्छतेची अनेक बंधने पाळवी लागतात. वस्तरा व इतर साधने निर्जंतूक करून घेण्याखेरीज प्रत्येक मुंडणासाठी नवी ब्लेड वापरणे त्यांना बंधनकारक असते. भाविकांनी मुंडण करून देवाला वाहिलेल्या केसांच्या विक्रीतून मंदिराला दरवर्षी १५० ते २०० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते.
या पवित्र ठिकाणी आम्ही कोणताही भ्रष्ट व्यवहार खपवून घेणार नाही. काही नाभिकांमुळे संस्थानचे नाव खराब होते. काढून टाकलेल्या नाभिकांच्या जागी लवकरच चांगल्या वर्तनाचे नवे नाभिक नेमले जातील.

-टी, रवी, अधिकृत प्रवक्ते,
तिरुमला तिरुपती देवस्थान

Web Title:  Out of 243 nuclei extracting money from devotees, Tirupati Devasthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Indiaभारत