जगातील अतिशय प्रदूषित ३० शहरांपैकी २२ शहरे भारतातील, दिल्लीतील हवेचा दर्जा सुधारला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 03:58 AM2021-03-17T03:58:48+5:302021-03-17T06:58:00+5:30
दिल्लीतील हवेचा दर्जा २०१९ पासून २०२० पर्यंत अंदाजे १५ टक्क्यांनी सुधारला असल्याचे अहवालाने म्हटले. दिल्लीच्या हवेचा दर्जा सुधारला असला तरी प्रचंड प्रदूषित शहरांत दिल्लीचा क्रमांक १० आहे आणि जगात प्रचंड प्रदूषित राजधानीच्या शहरात दिल्ली वरच्या स्थानी आहे.
नवी दिल्ली : जगात अतिशय प्रदूषित असलेली ३० पैकी २२ शहरे भारतात आहेत. जगात प्रचंड प्रदूषित राजधानीच्या शहरात दिल्लीचा समावेश आहे, असे नव्या अहवालाने मंगळवारी म्हटले. हा अहवाल आयक्यूएअर या स्वीस संघटनेने ‘वर्ल्ड एअर क्वॉलिटी रिपोर्ट, २०२०’ या स्वरूपात तयार केला आहे.
दिल्लीतील हवेचा दर्जा २०१९ पासून २०२० पर्यंत अंदाजे १५ टक्क्यांनी सुधारला असल्याचे अहवालाने म्हटले. दिल्लीच्या हवेचा दर्जा सुधारला असला तरी प्रचंड प्रदूषित शहरांत दिल्लीचा क्रमांक १० आहे आणि जगात प्रचंड प्रदूषित राजधानीच्या शहरात दिल्ली वरच्या स्थानी आहे. दिल्लीशिवाय जगातील अत्यंत प्रदूषित ३० शहरांपैकी २१ शहरांत उत्तर प्रदेशातील गाझियाबाद, बुलंदशहर, बिसराख, जलालपूर, नोएडा, ग्रेटर नोएडा, कानपूर, लखनौ, मेरठ, आग्रा आणि मुजफ्फरनगर, राजस्थानातील भिवारी, हरयाणातील फरिदाबाद, जिंद, हिसार, फतेहाबाद, बंधवारी, गुरुग्राम, यमुनानगर, रोहटक आणि धारुहेरा, आणि बिहारमधील मुजफ्फरपूरचा समावेश आहे.
दुसऱ्या क्रमांकावर गाझियाबाद
अहवालात अतिप्रदूषित शहरात चीनमधील शिनजियांगचा समावेश असून, त्यानंतर नऊ भारतीय शहरे येतात. जगात दुसऱ्या क्रमांकाचे प्रदूषित शहर गाझियाबाद असून, त्यानंतर बुलंदशहर, बिसराख, जलालपूर, नोएडा, ग्रेटर नोेएडा, कानपूर, लखनौ आणि भिवारीचा क्रम लागतो.