मणिपुरात पुन्हा भडका! तीन ठार; २४ तासांपासून गोळीबार सुरू, घरे पेटवून देण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2023 06:13 AM2023-08-06T06:13:33+5:302023-08-06T06:13:54+5:30
विष्णूपूर पोलिसांनी सांगितले की, काही समाजकंटक बफर झोन पार करून मैतेई समुदायाच्या भूभागात घुसले. त्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात तीन जण ठार झाले.
इंफाळ : मणिपुरात पुन्हा एकदा हिंसाचार भडकला असून शुक्रवारी रात्री विष्णूपूर जिल्ह्यात मैतेई समुदायातील तीन लोकांची हत्या करण्यात आली. तसेच कुकी समुदायातील लोकांच्या अनेक घरांना आग लावण्यात आली. राज्यातील अनेक भागात मागील २४ तासांपासून गोळीबार सुरू आहे.
विष्णूपूर पोलिसांनी सांगितले की, काही समाजकंटक बफर झोन पार करून मैतेई समुदायाच्या भूभागात घुसले. त्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात तीन जण ठार झाले. विष्णूपूर जिल्ह्यातील क्वाक्टा भागापासून दाेन किलोमीटरनंतर केंद्रीय सुरक्षा दलांनी बफर झोन तयार केला आहे.
त्याआधी गुरुवारी सायंकाळी विष्णूपूरमध्ये अनेक भागांत गोळीबारानंतर परिस्थिती तणावपूर्ण बनली होती. हिंसक जमावाची सुरक्षा दलांसोबत चकमक झडली. या भागात सुरक्षा दलांनी सात भूमिगत बंकर उद्ध्वस्त केले आहेत. (वृत्तसंस्था)
मृतांमध्ये पिता-पुत्राचा समावेश
शुक्रवारी रात्री मारल्या गेलेल्या ३ जणांत एका पिता-पुत्राच्या जोडीचा समावेश आहे. विष्णूपूरजवळील क्वाक्टा येथे अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर झोपेतच गोळ्या झाडल्या. मारले गेलेले दुपारीच निर्वासित छावण्यातून घरी परतले होते. हत्याकांडाचे वृत्त आल्यानंतर क्वाक्टामध्ये मोठा जमाव जमला. चालून जाण्या आधीच जमावाला सुरक्षा दलांनी रोखले. यावेळी उडालेल्या चकमकीत पोलिसासह ३ जण जखमी झाले.
शिथिल केलेली संचारबंदी पुन्हा लागू
विष्णूपूर जिल्ह्यातील दुसऱ्या आयआरबी युनिटच्या छावण्यांवर हिंसक जमावाने हल्ला करून शस्त्रास्त्रे व दारूगाेळा लुटून नेला. मणिपूर राइफल्सची दुसरी बटालियन आणि ७ टीयू बटालियनची शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा लुटण्याचा प्रयत्न सुरक्षा दलांनी हाणून पाडला. यावेळी सुरक्षा दले आणि हिंसक जमाव यांच्यात चकमक उडाली. हिंसाचारामुळे शिथिल करण्यात आलेली संचारबंदी पुन्हा लागू करण्यात आली आहे.
१६० हून अधिक बळी
मैतेई समुदायास अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याच्या विरोधात कुकी समुदायाने सुरू केलेल्या आंदोलनातून मणिपुरातील संघर्ष निर्माण झाला. हिंसाचारात आतापर्यंत १६० पेक्षाही अधिक लोक ठार झाले असून शेकडो लोक जखमी झाले आहेत. मणिपुरात मैतेई समुदायाची संख्या सुमारे ५३ टक्के असून ते इम्फाळ खोऱ्यात राहतात.
जनजीवन विस्कळीत
मणिपुरातील समन्वय समितीने दिलेल्या मणिपूर बंदच्या हाकेमुळे शनिवारी जनजीवन विस्कळीत झाले. शाळा-महाविद्यालये तसेच व्यावसायिक प्रतिष्ठानांसह सर्व व्यवहार बंद राहिले. पहाडी भागात मात्र बंदचा परिणाम दिसून आला नाही. समितीचे समन्वयक एल. बिनोद यांनी सांगितले की, सरकारवर दबाव निर्माण करण्यासाठी हा बंद पुकारण्यात आला आहे.