उत्तर प्रदेशमध्ये भयावह आजाराचे थैमान, आजारी मुलाला पाहून आई तडफडतेय, कडेवर घेऊन वडिलांची वणवण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2021 07:33 PM2021-09-04T19:33:57+5:302021-09-04T19:33:57+5:30
Dengue in Uttar Pradesh: उत्तर प्रदेशमधील काही भागांमध्ये डेंग्यूच्या साथीने थैमान घातले आहे. डेंग्यूमुळे फिरोजाबादमध्ये आतापर्यंत १०० हून अधिक मुलांचा मृत्यू झाला आहे.
फिरोजाबाद - उत्तर प्रदेशमधील काही भागांमध्ये डेंग्यूच्या साथीने थैमान घातले आहे. डेंग्यूमुळे फिरोजाबादमध्ये आतापर्यंत १०० हून अधिक मुलांचा मृत्यू झाला आहे. मुलांवर दिसून येत असलेला डेंग्यूचा प्रकोप पाहून आई-वडिलांच्या काळजाचे पाणी पाणी होत आहे. मुलांचा जीव वाचवण्यासाठी वडील कर्ज उभारून उपचार मिळवत आहेत. मात्र तरीही काही मुलांना प्राण गमवावे लागत आहेत. (Outbreak of dengue in Uttar Pradesh)
मुलांवरील उपचारांसाठी खास करून तयार करण्यात आलेल्य शहरातील रुग्णालयात १०० खाटा उपलब्ध आहेत. मात्र तिथे ४०० हून अधिक मुलांवर उपचार सुरू आहेत. येथील आमदारांच्या प्रयत्नामधून या वॉर्डमध्ये एका दिवसात १०० आणखी बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र तरीही हे बेड कमी पडत आहेत. तसेच दररोज मुले आजारामुळे प्राण सोडत आहेत. मुलांच्या रक्त तपासणीसाठी प्रयत्न सुरू आहेत. यासंदर्भातील वृत्त एनबीटीने दिले आहे. येथील रुग्णालयाचा आढावा घेतला असता तिथे एक आई मुलाला मांडीवर घेऊन रडत होती. तर वडीलही चिंतातूर होऊन बसले होते. मुलाला जवळ घेऊन ते उपचार कधी सुरू होतील, याची वाट पाहत होते.
दरम्यान, मुख्य आरोग्य सचिव आलोक कुमार परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मेडिकल कॉलेजमध्ये पोहोचले आहेत. तिथे त्यांनी रुग्णालयात दाखल रुग्णांच्या प्रकृतीबाबत त्यांनी माहिती घेतली. त्यांच्यासोबत डीएम चंद्रविजय, मेडिकल कॉलेजच्या प्राचार्या डॉ. संगीता अनेजा या सुद्धा उपस्थित होत्या. मात्र यावेळी मेडिकल कॉलेजमधील पत्रकारांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली होती.