केळी विमा रक्कमेवरून शेतकर्यांचा उद्रेक जिल्हा बँकेत आंदोलन : कार्यकारी संचालकांची खुर्ची फेकली
By admin | Published: January 12, 2016 11:16 PM2016-01-12T23:16:12+5:302016-01-12T23:55:24+5:30
संतप्त शेतकर्यांनी कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांची खुर्ची फेकून दिली व बँक प्रशासनाचा निषेध केला.
जळगाव- केळी पीक विम्याची रक्कम मिळत नसल्याने जळगाव तालुक्यातील संतप्त शेतकर्यांच्या भावनांचा मंगळवारी दुपारी जिल्हा बँकेत उद्रेक झाला. संतप्त शेतकर्यांनी कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांची खुर्ची फेकून दिली व बँक प्रशासनाचा निषेध केला. याप्रकरणी आंदोलनकर्त्या शेतकर्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
२०१४-१५ या वर्षात केळीला विमा सुरक्षा म्हणून जिल्हा बँकेतर्फे विमा कंपनीकडे हप्ते भरलेल्या शेतकर्यांना विम्याची रक्कम मिळालेली नाही. राष्ट्रीयकृत बँकांतर्फे ज्या शेतकर्यांनी केळीसाठी विमा काढला त्यांना विमासंबंधीची रक्कम मिळत आहे. पण जिल्हा बँकेतर्फे ज्या शेतकर्यांनी विमा संबंधीची रक्कम का मिळत नाही याची माहिती घेण्यासाठी पिंप्राळा मंडळ अंतर्गत विमा रक्कम भरलेल्या शेतकर्यांनी जिल्हा बँकेचे मुख्यालय गाठले व तेथे कार्यकारी संचालक देशमुख यांना जाब विचारला. पण कार्यकारी संचालक हे समाधानकारक माहिती देऊ शकले नाही. नंतर कार्यकारी संचालक एका महत्त्वाच्या बैठकीला जायचे असल्याचे सांगून आपल्या दालनातून निघून गेले. त्यानंतर त्यांची खुर्ची शेतकर्यांनी फेकली. तेथून ते शेतकरी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांच्याकडे गेले. जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे यांनी पिंप्राळा मंडळांतर्गत विमाधारक शेतकरी व कुणाला मदतीची रक्कम मिळाली याची माहिती दिली.
दरम्यान, जिल्हा बॅँकेतील गोंधळ प्रकरणी शामकांत भाऊलाल जाधव (रा.फुपनगरी ता.जळगाव), कैलास छगन चौधरी (रा.खेडी ता.जळगाव), हर्षल प्रल्हाद चौधरी (रा.आव्हाणे ता.जळगाव) यांच्यासह १५ ते २० जणांविरुद्ध जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला कलम १४३, १४७, ३५३, ४२७, ५०६ व सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरणचे ३/२७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीक विमा संदर्भातील फाईल फेकून सुमारे आठ हजाराचे नुकसान केल्याची फिर्याद प्रकाश भटा पाटील यांनी दिली आहे.