काश्मीरमध्ये उद्रेक !

By Admin | Published: July 10, 2016 04:43 AM2016-07-10T04:43:04+5:302016-07-10T04:43:04+5:30

हिज्बुल मुजाहिदीनचा पोस्टर बॉय बुऱ्हाण वाणी याचा सुरक्षा दलांनी शुक्रवारी एका चकमकीत खातमा केल्यानंतर संपूर्ण काश्मीर खोऱ्यात हिंसाचार उसळला आहे. ठिकठिकाणी सरकार, पोलीस

Outbreak in Kashmir! | काश्मीरमध्ये उद्रेक !

काश्मीरमध्ये उद्रेक !

googlenewsNext

श्रीनगर : हिज्बुल मुजाहिदीनचा पोस्टर बॉय बुऱ्हाण वाणी याचा सुरक्षा दलांनी शुक्रवारी एका चकमकीत खातमा केल्यानंतर संपूर्ण काश्मीर खोऱ्यात हिंसाचार उसळला आहे. ठिकठिकाणी सरकार, पोलीस आणि लष्कराविरोधात निदर्शने सुरू असून, हिंसाचारात ९ जण ठार, तर९६ पोलिसांसह १२६ जण जखमी झाले आहेत. लोक उघडपणे पाक ध्वज फडकावत असून, आहेत. कायदा व सुव्यवस्था आणखी बिघडू नये, म्हणून काश्मीर खोऱ्यातील इंटरनेट सेवा बंद केली असून, अमरनाथ यात्राही स्थगित करण्यात आली आहे.
हल्लेखोर जमावाने पाच इमारतीही जाळल्या, त्यात तीन पोलिस ठाण्यांनाही आगी लावल्या आहेत. कुलगाममध्ये भाजपा कार्यालयावरही हल्ला करण्यात आला. फुटीरवादी नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात करताना, दक्षिण काश्मिरात मोबाईल टेलिफोन सेवा मर्यादित करण्यात आली आहे. बारामुल्ला ते बानिहाल या पीरपंजाल पर्वतराजीच्या परिसरात रेल्वे सेवा बंद करण्यात आली आहे. अचलबल आणि दामहाल हाजीपोरा येथे पोलिस ठाणी जमावाने जाळली. पुलवामा जिल्ह्यात दोन सरकारी कार्यालये आणि तीन बसगाड्या जाळण्यात आल्या.
अनंतनाग जिल्ह्यातील वेरीनाग भागात एक तरुण सुरक्षा दलांच्या गोळीबारात ठार झाला. तत्पूर्वी आणखी एक तरुण मारला गेला, तर एकाला दवाखान्यात मृतावस्थेत आणण्यात आले.
काश्मिरातील हिंसाचार दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया कॉगे्रसने दिली आहे. काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी सांगितले की, बुऱ्हान अतिरेकी होता. त्याच्या हत्येच्या निषेधार्थ हिंसाचार होणे हे दुर्दैवी आहे. शेकडो निष्पाप लोकांचा बळी घेणाऱ्या अतिरेक्याच्या हत्येबद्दल लोकांनी शोक व्यक्त करू नये. (वृत्तसंस्था)

बुऱ्हानचा मृतदेह पाकच्या ध्वजात
सुरक्षा दलांनी बुऱ्हान वणीचा
मृतदेह शुक्रवारी सायंकाळी त्याच्या कुटुंबियांच्या ताब्यात दिल्यानंतर शनिवारी दुपारी तो दफनविधीसाठी त्राल या त्याच्या मूळ गावी आणण्यात आला. दफनविधीला गर्दी होऊ नये यासाठी हमरस्ते बंद करण्यात आले होते तरी हजारो लोक डोंगरवाटांनी व पायवाटांनी तेथे जमा झाले. १९९० च्या काश्मीर खोऱ्यातील उद्रेकानंतर पोलिसी कारवाईत मारल्या गेलेल्या कोणाही बंडखोराच्या अंत्ययात्रेस जमलेला हा सर्वात मोठा जनसमुदाय होता, असे मानले जात आहे.
विशेष म्हणजे काश्मीरच्या आझादीसाठी वयाच्या १५ व्या वर्षी हिजबूल मुजाहिदीनमध्ये सामील झालेल्या बुऱ्हानचा मृतदेह पाकच्या राष्ट्रध्वजात गुंडाळण्यात आला होता. त्याशिवाय शेकडो लोक उघडपणे पाकिस्तानचा ध्वज फडकावित होते. ‘तुम कितने बुऱ्हान मारोंगे,
हर घरसे बुऱ्हान निकलेगा’, अशा घोषणा देण्यात येत होत्या.
बाहेरगावाहून आलेल्या लोकांचा स्थानिक नागरिकांनी आपल्या घरांत पाहुणचार केला. हिजबूलचे अनेक सक्रिय बंडखोरही अंत्ययात्रेत सामिल झाल्याचे समजते. त्यांनी हवेत रायफलींच्या फैरी झाडून बुऱ्हानला मानवंदनाही दिली. हजारोंच्या साक्षीने
मोठा भाऊ खलिद
याच्या कबरीच्या
बाजूला बुऱ्हानचे दफन करण्यात आले.

भाजपा कार्यालयावर हल्ला
अनंतनाग जिल्ह्यातील बांदिपोरा, काझीगुंग आणि लारनू या ठिकाणी तरुणांच्या गटांनी रस्त्यावर उतरून पोलीस चौक्यांवर हल्ले केले. कुलगाम जिल्ह्यातील मीर बाजार, दामहाल हांजीपोरा, तसेच बारामुल्ला जिल्ह्यातील वारपोरा आणि सोपोर येथे हिंसक निदर्शने केली.
दक्षिण काश्मीरमधील वेस्सू येथे अल्पसंख्याक समुदायाचे संरक्षण करणाऱ्या पोलीस चौकीवर हल्ला करण्यात आला. कुलगाम जिल्ह्यातील निलो-बुगम भागात भाजपा कार्यालयावर जमावाने हल्ला केला. त्यात इमारतीचे नुकसान झाले. बारामुल्लातील शिरी, खिरी, डेलिना, पट्टण, पल्हालन, तसेच दक्षिण काश्मिरातील बरसू, शरिफाबाद येथेही हिंसक निदर्शने झाली.

काश्मीर बंदची हाक :
बुऱ्हाण वाणी याला ठार मारल्याच्या निषेधार्थ फुटीरवादी गटांनी काश्मिरात एक दिवसाच्या बंदची हाक दिली होती. हा बंद त्यांनी ११ जुलैपर्यंत वाढविला आहे. हुरियतच्या मवाळ गटाचे चेअरमन मीरवैझ उमर फारुख यांनी एक निवेदन जारी करून बंद पाळण्याचे आवाहन काश्मिरी नागरिकांना केले आहे.

फुटीरवाद्यांना नवे प्रतीक मिळाले
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया नोंदविताना म्हटले की, बुऱ्हाण वाणीच्या रूपाने फुटीरवादाच्या समर्थकांना नवे प्रतीक मिळाले आहे.
माझे शब्द नोंदवून ठेवा, बुऱ्हाणने सोशल मीडियातून जेवढी अतिरेकी भरती केली त्यापेक्षा किती तरी जास्त भरती तो आता त्याच्या कबरीतून करील. श्रीनगरातील मशिदीतून कित्येक वर्षांनी मी आज पहिल्यांदा आझादीचे नारे ऐकले.

बुऱ्हानने जिवंत असताना काश्मीरमध्ये तैनात असलेल्या आठ लाख भारतीय सैनिकांची झोप उडविली व आता अल्लाला प्यारे होऊन त्याने काश्मीरच्या आझादीच्या लढ्यात नवी जान फुंकली. हिजबूलच्या झेंड्याखाली त्याने डझनावारी बुऱ्हान तयार केले व आता त्याच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून काश्मीर खोऱ्यात आणखी हजारो बुऱ्हान पैदा होतील.
- सैयद सलाहुद्दीन, प्रमुख युनायटेड जिहाद कौन्सिल

Web Title: Outbreak in Kashmir!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.