अयोध्या प्रकरणाचा आज निकाल, गुलाल नको, निषेधही नको
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2019 06:38 AM2019-11-09T06:38:23+5:302019-11-09T06:38:35+5:30
सर्वत्र बंदोबस्त; सोशल मीडियावर निर्बंध, आनंद वा निषेध व्यक्त करण्यास बंदी
नवी दिल्ली : अयोध्येतील मशीद-मंदिर जमिनीच्या मालकीच्या वादावरील निकाल सर्वोच्च न्यायालय उद्या, शनिवारी देणार आहे. राजकीय व सामाजिकदृष्ट्या संवेदनशील विषयावरील निकालाचे वाचन उद्या सकाळी १0.३0 वाजता सुरू होईल. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे ४0 दिवस सुनावणी झाल्यानंतर १५ आॅक्टोबर रोजी न्यायालयाने निकाल राखून ठेवला खास या निकालासाठी न्यायालयाने उद्याचा दिवस निश्चित केला आहे. न्या. रंजन गोगोई यांनी आज उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव व पोलीस महासंचालकांशी अयोध्येतील कायदा व सुव्यवस्था स्थितीवर सविस्तर चर्चा केली.
या निकालामुळे सर्व राज्यांमध्ये सतर्क राहण्याच्या सूचना आहेत. पोलिसांचा तसेच सशस्त्र दलांचा कडक बंदोबस्त वाढवला आहे. सोशल मीडियावरून विविध अफवा वा प्रक्षोभक संदेश एकमेकांना पाठवले जाण्याची शक्यता लक्षात घेऊ न सोशल मीडियावर पोलीस लक्ष ठेवून आहेत. दोन्ही समाजांच्या बैठका घेऊ न निकाल शांततेने मान्य करण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या. मुंबई-दिल्लीतही पोलिसांनी न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त करू नका, असे सांगितले आहे.
गुलाल नको, निषेधही नको
दोन्ही समाजांच्या प्रमुख नेत्यांच्या तसेच धार्मिक नेत्यांच्या बैठकांमध्ये न्यायालयाच्या निकालानंतर कोणी गुलाल उधळू नये, मिठाई वाटू नये, फटाके उडवू नये वा निषेधही करू नये, असे स्पष्टपणे सांगितले आहे. केवळ त्या सूचनांवर अवलंबून न राहता, सर्व शहरांच्या नाक्यानाक्यांवर रेल्वे स्थानके, बस स्थानके, विमानतळे येथे वा कोणत्याही गर्दीच्या ठिकाणी आणि धार्मिक स्थळी टोकाच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जाऊ नयेत, यासाठी पोलीस बंदोबस्त शुक्रवारी रात्रीपासूनच वाढवण्यात आला आहे.