संतापजनक... ७ दिवस बलात्कार; गरम डाळ टाकून केले टॉर्चर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2024 07:14 AM2024-02-08T07:14:54+5:302024-02-08T07:15:27+5:30
दिल्लीतील नेब सराय पोलिस स्टेशनमध्ये एक फोन आला. यात एका महिलेला तिच्या पतीकडून मारहाण होत असल्याचे सांगण्यात आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : दार्जिलिंगमधील एका महिलेवर तिच्या मित्राने दिल्लीत सात दिवस बलात्कार केला. आरोपीने पीडितेला केवळ मारहाणच केली नाही तर तिच्यावर गरम डाळ टाकून टॉर्चर करण्याचा प्रयत्न केला.
दिल्लीतील नेब सराय पोलिस स्टेशनमध्ये एक फोन आला. यात एका महिलेला तिच्या पतीकडून मारहाण होत असल्याचे सांगण्यात आले होते. यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. येथे पीडित महिलेची सुटका करून तिला एम्समध्ये नेण्यात आले. महिलेच्या शरीरावर २० जखमांच्या खुणा आढळून आल्या आहेत. पोलिसांनी आरोपीला अटक केली. पारस (२८) असे आरोपीचे नाव आहे. तो मूळचा उत्तराखंडचा असून दिल्लीतील एका हॉटेलमध्ये स्वयंपाकी होता. तिला नोकरीसाठी बंगळुरूला जायचे होते. तिची ट्रेन दिल्लीतून जाणार असल्याने तिने पारसला भेटायचे ठरवले होते. मात्र, पारसने तिला जाऊ न देता आपल्यासोबत ठेवले आणि तिच्यावर अत्याचार केला. आरोपीविरुद्ध आयपीसी कलम ३२३ (जाणूनबुजून दुखापत करणे), ३७६ (बलात्कार) आणि ३७७ (अनैसर्गिक लैंगिक संबंध) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.