लष्करात महिलांचा सहभाग वाढला; 10 हजारांहून अधिक महिला अधिकारी कार्यरत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 09:34 PM2022-03-28T21:34:25+5:302022-03-28T21:36:06+5:30
Women Officer : भारतीय हवाई दलाने आतापर्यंत 15 महिला लढाऊ वैमानिकांना नियुक्त केले आहे आणि महिला अधिकाऱ्यांना आता सर्व लढाऊ भूमिकांमध्ये सामील केले जात आहे, तर नौदलाने यापूर्वीच 28 महिला अधिकाऱ्यांना जहाजांवर तैनात केले आहे.
नवी दिल्ली : संरक्षण दलात सेवा देणाऱ्या महिला अधिकाऱ्यांची संख्या 10,493 आहे, त्यापैकी सुमारे 4,734 मिलिटरी नर्सिंग सर्व्हिस अधिकारी आहेत. ही माहिती सोमवारी संसदेत देण्यात आली. संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी राज्यसभेत सांगितले की, भारतीय लष्करात एकूण 1,705 महिला अधिकारी आहेत, भारतीय हवाई दलात 1,640, तर नौदलात 559 महिला अधिकारी आहेत. तसेच, सशस्त्र दल वैद्यकीय सेवेत 1,855 आणि मिलिटरी नर्सिंग सेवेत 4,734 महिला अधिकारी आहेत.
संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट म्हणाले की, सध्या महिलांना लष्करात दहा शस्त्रे आणि कॉर्प्स ऑफ इंजिनिअर्स, कॉर्प्स सशस्त्र दल वैद्यकीय सेवांसह सिग्नल्स, आर्मी एअर डिफेन्स, आर्मी सर्व्हिस आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स, कॉर्प्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल इंजिनिअर्स, आर्मी एव्हिएशन कॉर्प्स, इंटेलिजन्स कॉर्प्स, जज अॅडव्होकेट जनरल ब्रँच आणि आर्मी एज्युकेशन कॉर्प्समध्ये सामील केले जात आहे.
भारतीय हवाई दलाने आतापर्यंत 15 महिला लढाऊ वैमानिकांना नियुक्त केले आहे आणि महिला अधिकाऱ्यांना आता सर्व लढाऊ भूमिकांमध्ये सामील केले जात आहे, तर नौदलाने यापूर्वीच 28 महिला अधिकाऱ्यांना जहाजांवर तैनात केले आहे. नौदलाची विमाने आणि जहाजातून वाहून नेणाऱ्या हेलिकॉप्टरमध्येही महिला अधिकारी लढाऊ भूमिकेत तैनात केल्या जात आहेत, असे संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी सांगितले.
याचबरोबर, भारतीय सैन्यात महिलांना लष्करी पोलीस दलातील इतर पदांप्रमाणेच नावनोंदणी करण्याची तरतूद 2019 मध्ये सुरू करण्यात आली आहे आणि त्याअंतर्गत 1,700 महिला कर्मचार्यांना टप्प्याटप्प्याने दरवर्षी जळपास 100 च्या संख्येने सामील करण्याची योजना तयार केली जात आहे, असेही संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट म्हणाले.