देशात सक्रिय रुग्ण १२ लाखांवर; २ लाख ६४ हजार नवे बाधित, ओमायक्राॅनग्रस्तांत ५ टक्के वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2022 10:20 AM2022-01-15T10:20:29+5:302022-01-15T10:20:42+5:30
केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार सध्या असलेल्या सक्रिय रुग्णांचे प्रमाण हे मागील २२० दिवसांतील सर्वाधिक आहे.
नवी दिल्ली : देशात गेल्या चोवीस तासांत कोरोनाचे २ लाख ६४ हजार नवे रुग्ण आढळले. ही मागील २३९ दिवसांतील सर्वाधिक संख्या आहे. ओमायक्रॉनच्या रुग्णांचा आकडा ५७५३ वर पोहोचला आहे. गुरुवारपासून या विषाणूच्या बाधितांमध्ये ४.८३ टक्के वाढ झाली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या १२ लाख ७२ हजार झाली आहे.
केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार सध्या असलेल्या सक्रिय रुग्णांचे प्रमाण हे मागील २२० दिवसांतील सर्वाधिक आहे.
गेल्या चोवीस तासांत २ लाख ६४ हजार २०२ नवे रुग्ण आढळले व ३१५ जणांचा मृत्यू झाला. मरण पावलेल्यांची एकूण संख्या ४ लाख ८५ हजार ३५० झाली. कोरोनाबाधितांपैकी ३.४८ टक्के सक्रिय रुग्ण आहेत. बरे होणाऱ्यांचे प्रमाण ९५.२० टक्के आहे.
दिल्लीत मृतांपैकी ७५% लोकांनी घेतली नव्हती लस
दिल्लीमध्ये नुकत्याच आलेल्या लाटेत मरण पावलेल्यांपैकी ७५ टक्के जणांनी लस घेतली नव्हती अशी माहिती तेथील आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी दिली. दिल्लीत गुरुवारी २८८६७ नवे कोरोना रुग्ण सापडले होते. त्या शहरात ९ जानेवारी ते १२ जानेवारी या कालावधीत कोरोनामुळे ९७ जण मरण पावले.
मध्यप्रदेशातील शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद
मध्य प्रदेश सरकारने ३१ जानेवारीपर्यंत सरकारी आणि खासगी क्षेत्रांतील सर्व शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील कृषिमंत्री कमल पटेल, जलसंसाधन मंत्री तुलसी सिलावट, वैद्यकीय शिक्षणमंत्री विश्वास सारंग यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.