श्वास गुदमरतोय! भारतात वायू प्रदूषणामुळे एकाच वर्षात 12 लाख मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2019 02:37 PM2019-04-03T14:37:48+5:302019-04-03T14:50:30+5:30
वायू प्रदूषणाचा भारत आणि चीनला सर्वाधिक फटका
नवी दिल्ली: वायू प्रदूषणाचा सर्वाधिक फटका भारत आणि चीनला बसत असल्याची आकडेवारी समोर आली आहे. 2017 मध्ये जगभरात वायू प्रदूषणामुळे 50 लाख लोकांनी जीव गमावला. त्यातील निम्मे मृत्यूभारत आणि चीनमध्ये झाले आहेत. अमेरिकेतील न्यू ग्लोबल स्टडी आणि स्टेट ऑफ ग्लोबल स्टडी या संस्थांनी वायू प्रदूषणामुळे होत असलेल्या जीवितहानीची आकडेवारी प्रसिद्ध केली.
2017 मध्ये जगभरात वायू प्रदूषणामुळे 50 लाख लोकांचा प्राण गेला. यातील जवळपास 12 लाख लोक भारताचे आहेत. भारत आणि चीनमधील प्रत्येकी 12 लाख लोकांचा वायू प्रदूषणामुळे मृत्यू झाल्याची आकडेवारी अहवालात आहे. यामध्ये घरात होत असलेल्या वायू प्रदूषणाचादेखील समावेश आहे. दक्षिण आशियातील वायू प्रदूषणाचं संकट अतिशय भीषण असल्याचं अहवाल सांगतो. वाढत्या वायू प्रदूषणामुळे दक्षिण आशियात जन्म घेत असलेल्या मुलांचं सरासरी आयुष्य दीड वर्षांनी कमी होत असल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे.
वायू प्रदूषणामुळे होत असलेल्या मृत्यूंचा आकडा वाढतच असल्याचं वास्तव अहवालातून अधोरेखित झालं आहे. 2016 मध्ये वायू प्रदूषणामुळे भारतात 11 लाख लोकांचा मृत्यू झाला. 2017 मध्ये हेच प्रमाण 12 लाखांवर गेलं आहे. दिल्ली, फरिदाबाद आणि गुरुग्राममधील परिस्थिती अतिशय भयंकर असल्याचं अहवाल सांगतो. देशातील आरोग्याच्या समस्या लक्षात घेतल्यास त्यात वायू प्रदूषणाचा तिसरा क्रमांक लागतो. कुपोषण, मद्यसेवन आणि शारीरिक निष्क्रियतेपेक्षा अधिक मृत्यू वायू प्रदूषणामुळे होतात.