फक्त एका वर्षात हवा प्रदूषणामुळे भारतात 14 लाख लोकांचा मृत्यू
By admin | Published: September 9, 2016 08:07 AM2016-09-09T08:07:11+5:302016-09-09T08:07:11+5:30
भारतामध्ये 2013 साली हवा प्रदूषणामुळे तब्बल 14 लाख लोकांनी आपला जीव गमावला आहे. तर चीनमध्ये 16 लाख लोकांना आपल्या प्राणाला मुकावे लागले आहे.
Next
>- ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 9 - भारतामध्ये 2013 साली हवा प्रदूषणामुळे तब्बल 14 लाख लोकांनी आपला जीव गमावला आहे. तर चीनमध्ये 16 लाख लोकांना आपल्या प्राणाला मुकावे लागले आहे. वर्ल्ड बँक, इन्सिट्यूट ऑफ हेल्थ मेट्रिक्स अॅण्ड इव्हॅल्युएशन यांनी संयुक्तरित्या प्रसिद्ध केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
हवा प्रदुषणामुळे झालेल्या वेगवेगळ्या आजारांमुळे जगभरात 2013 साली एकूण 50 लाख लोकांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती या अहवालात देण्यात आली आहे. विशेष म्हणजे यामधील 60 टक्के मृत्यू सर्वात जास्त लोकसंख्या असणा-या चीन आणि भारतात झाले आहेत. हवा प्रदूषणामुळे फुफ्फुसाचा कर्करोग, स्ट्रोक, ह्रद्याचे आजार होतात, ज्यामुळे मृत्यूचं प्रमाण वाढलं आहे.
भारत आणि चीनला लोकसंख्या जास्त असल्याचा फटका बसला आहे असं म्हणणं योग्य ठरणार नाही. 1 लाख लोकांच्या मागे मृत्यूचं प्रमाण पाहिल्यास जगभरातील देशांमध्ये चीन सहाव्या तर भारत चौथ्या क्रमांकावर आहे. सोबतच बांगलादेश 11, श्रीलंका 12 आणि पाकिस्तान 15व्या क्रमांकावर आहे.