ओमायक्रॉनचा विळखा घट्ट! रुग्णसंख्या १७० वर; कर्नाटक, गुजरात, केरळ, दिल्लीमध्ये नवे रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 05:48 AM2021-12-21T05:48:04+5:302021-12-21T05:49:29+5:30
देशातील ओमायक्रॉनच्या संसर्गाचा विळखा अधिक घट्ट होत चालला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : देशातील ओमायक्रॉनच्या संसर्गाचा विळखा अधिक घट्ट होत चालला आहे. कर्नाटक, गुजरात, केरळ, दिल्लीमध्ये या विषाणूचे नवे रुग्ण सोमवारी आढळले. त्यामुळे ओमायक्रॉनच्या एकूण रुग्णांची संख्या आता १७०वर पोहोचली आहे.
आतापर्यंत महाराष्ट्र, दिल्ली, तेलंगणा, राजस्थान, कर्नाटक, केरळ, गुजरात. उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, चंडीगड येथे ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत. या विषाणूने बाधित रुग्णांची संख्या जगभरात वेगाने वाढत असतानाच, भारतातही या संसर्गाने हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे.
कर्नाटकमधील धारवाड, भद्रावती, उडुपी, मंगळुरू येथे ओमायक्रॉनचे पाच नवे रुग्ण सोमवारी सापडले. दिल्लीत या विषाणूचे आणखी सहा बाधित आढळले असून तेथील अशा रुग्णांची एकूण संख्या २८वर पोहोचली आहे. त्यातील चार लोकांना साकेत भागातील मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दिल्लीतील ओमायक्रॉन रुग्णांपैकी १२ जणांना रुग्णालयातून घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. तर बाकीच्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ओमायक्रॉन हा सर्वप्रथम दक्षिण आफ्रिकेमध्ये २४ नोव्हेंबर रोजी आढळून आला. त्यानंतर त्याचा जगभरातील ८९ देशांमध्ये प्रसार झाला आहे. डेल्टापेक्षा नव्या विषाणूचा संसर्ग अधिक वेगाने होतो. त्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे.
ब्रिटनमध्ये १२ हजार रुग्ण
ब्रिटनमध्ये ओमायक्रॉनने कहर माजविला असून तिथे गेल्या चोवीस तासांत १२ हजारांहून अधिक ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले. त्यामुळे अशा रुग्णांची तेथील एकूण संख्या आता ३७ हजारांहून अधिक झाली आहे.