लैशराम कमलबाबू सिंह यांच्या शोधात लष्कराचे 2000 जवान; जाणून घ्या, त्यांच्याविषयी?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 04:23 PM2024-12-03T16:23:54+5:302024-12-03T16:24:42+5:30
Laishram Kamalbabu Singh in Manipur : दोन हजारांहून अधिक लष्करी जवान तैनात करण्यात आले आहेत.
Laishram Kamalbabu Singh in Manipur : मणिपूरमध्ये गेल्या काही महिन्यांपूर्वी हिंसाचार उसळला होता. यानंतर याठिकाणी अद्याप म्हणावी तशी शांततेची परिस्थिती दिसून येत नाही. दरम्यान, येथील लैशराम कमलबाबू सिंह यांना शोधण्यासाठी भारतीय लष्कर युद्धपातळीवर कार्यरत आहे. एक आठवड्याहून अधिक काळ बेपत्ता असलेल्या मैतेई समुदायातील या व्यक्तीचा शोध लष्कराचे जवान घेत आहेत. यासाठी दोन हजारांहून अधिक लष्करी जवान तैनात करण्यात आले आहेत.
लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, लैशराम कमलबाबू सिंह हे मूळचे आसाममधील कछार जिल्ह्यातील असून ते इंफाळ पश्चिमेतील खुकरुल येथे राहत होते. 57 व्या माउंटन डिव्हिजनसाठी लेईमाखोंग मिलिटरी बेस येथे मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिस (एमईएस) सह काम करणाऱ्या कंत्राटदारासाठी ते कार्य पर्यवेक्षक होते. लैशराम कमलबाबू सिंह हे लष्करी तळावरून बेपत्ता झाल्याचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी म्हटले होते. तसेच, मुख्यमंत्र्यांनी लष्करी अधिकाऱ्यांना त्यांचा शोध घेण्यास सांगितले आहे.
मणिपूर पोलीस भारतीय लष्कराच्या मदतीने 25 नोव्हेंबर 2024 पासून लैशराम कमलबाबू सिंह याचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर शोध मोहीम राबवत आहेत, असे मणिपूर पोलिसांनी सोमवारी रात्री फेसबुकवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे. तसेच, पोस्टनुसार, लष्कराने 2000 हून अधिक जवान, हेलिकॉप्टर, ड्रोन आणि आर्मी स्निफर डॉगच्या मदतीने त्यांना शोधण्यासाठी सर्व मदत आणि संसाधने उपलब्ध करून दिली आहेत. तसेच, तांत्रिक बुद्धिमत्तेचा वापर करून पुढील तपास केला जात आहे.
पत्नीसह लोकांनी सुरु केलंय आंदोलन
दरम्यान, लैशराम कमलबाबू सिंह हे बेपत्ता झाल्यामुळे लष्कराच्या तळापासून अडीच किमी अंतरावर असलेल्या कांटो सबलमध्ये आंदोलन सुरू आहे. याठिकाणी रस्त्यावर बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. लैशराम कमलबाबू सिंह यांच्या पत्नी अकोईजम बेलारानी सुद्धा या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत.