नऊ महिन्यात पाकिस्तानकडून 2050 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन; भारताचं चोख प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 03:43 PM2019-09-15T15:43:36+5:302019-09-15T15:45:45+5:30
पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबाराला भारतीय जवानांचं चोख प्रत्युत्तर
नवी दिल्ली: सीमावर्ती भागात पाकिस्तानकडून सतत शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरू आहे. दहशतवाद्यांना भारतीय हद्दीत घुसवण्यासाठी पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार केला जात आहे. भारतीय लष्कराच्या चौक्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून दररोज सुरू आहे. या वर्षात पाकिस्ताननं 2050 हून अधिक वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. यामध्ये 21 भारतीयांना प्राण गमवावा लागला. पाकिस्ताननं केलेल्या गोळीबाराला भारतीय जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं रविवार एक प्रसिद्धीपत्रक जारी केलं. पाकिस्ताननं आपल्या सुरक्षा दलांना शस्त्रसंधीचं पालन करण्याच्या सूचना द्याव्यात, असं भारतानं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. पाकिस्ताननं नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर शांतता राखावी, असं आवाहन भारताकडून करण्यात आलं आहे. भारताकडून पाकिस्तानच्या गोळीबाराला जशास तसं उत्तर दिलं जात आहे. याशिवाय पाकिस्तानी सैन्याच्या मदतीनं होणारी घुसखोरी रोखण्याचे प्रयत्नदेखील सुरू आहेत.
याआधी दहशतवाद्याच्या मुद्द्यावरुन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तावर टीकास्त्र सोडलं होतं. पाकिस्ताननं दहशतवादाला लगाम घालावा. अन्यथा देशाचे तुकडे होतील आणि त्याला कोणीही रोखू शकणार नाही, असा इशारा राजनाथ यांनी दिला. भारतात अल्पसंख्यांक सुरक्षित होते, सुरक्षित राहतील आणि यापुढेही सुरक्षित राहतील. भारत धर्माच्या आधारे लोकांमध्ये फूट पाडत नाहीत, असंदेखील ते पुढे म्हणाले. काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्याचा निर्णय पाकिस्तानला पचवता आलेला नाही. त्यामुळे सध्या पाकिस्तान संयुक्त राष्ट्राची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे, असंदेखील सिंह यांनी म्हटलं.