21 हजार भारतीयांनी व्हीसाची मुदत उलटूनही अमेरिकेत वाढवला मुक्काम; 2017 चा अहवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2018 01:48 PM2018-08-08T13:48:46+5:302018-08-08T13:49:54+5:30
2017 या वर्षी 1 लाख 27 हजार 435 भारतीय विद्यार्थी आणि संशोधक विद्यार्थी यांनी एप, जे आणि एम व्हीसावर अमेरिकेत प्रवेश केला. त्यातील 4 हजार 400 भारतीय मुदत संपल्यावरही अमेरिकेत राहिले.
नवी दिल्ली- गेल्या वर्षी 21 हजार भारतीयांनी आपल्या व्हीसाची मुदत संपल्यावरही अमेरिकेत मुक्काम सुरुच ठेवल्याची नवी माहिती अहवालातून स्पष्ट झाली आहे. अर्थात असे करणाऱ्यांमध्ये भारतीयच आघाडीवर आहेत असे नाही तर भारतीयांपेक्षा इतर अनेक देशांच्या नागरिकांनी व्हीसाची मुदत उलटल्यावरही मायदेशी न जाता तेथेच दिवस काढल्याचे लक्षात आले आहे.
अमेरिकेचे डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटी दरवर्षी असा अहवाल प्रसिद्ध करत असते. 2017 या वर्षासाठी या विभागाने बुधवारी अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालानुसार 10. 7 लाख भारतीयांनी बी-1, बी-2 या व्हीसासाठी अर्ज केला होता. हे सर्व नागरिक व्यवसाय, सदिच्छा भेट किंवा पर्यटनासाठी अमेरिकेत जात होते. त्यापैकी 14 हजार 2014 लोकांनी व्हीसा संपल्यावरही तेथेच मुक्काम केला तर 12 हजार 498 लोकांनी अमेरिका सोडल्याची कोणतीही माहिती मिळालेली नाही. हे लोक बेकायदेशील स्थलांतरित म्हणून अमेरिकेतच राहात असावेत.
#WebduniaCheck The Homeland Security Department said that in 2017, more than 10.7 lakh Indians visited the US on the popular B-1, B-2 visashttps://t.co/yQUgz0yXaO
— Webdunia Check (@WebduniaCheck) August 8, 2018
2016 साली बी-1 आणि बी-2 व्हीसासाठी 10 लाख भारतीयांनी अर्ज केला होता मात्र त्यातील 17 हजार 763 लोकांनी व्हीसा संपल्यावरही अमेरिकेतच राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यातील 2,040 लोकांनी मुदत उलटल्यावर अमेरिका सोडली तर 15 हजार 723 लोक अजूनही बेकायदेशीर स्थलांतरित म्हणून अमेरिकेत कोठेतरी राहात असावेत. 2017 या वर्षी 1 लाख 27 हजार 435 भारतीय विद्यार्थी आणि संशोधक विद्यार्थी यांनी एप, जे आणि एम व्हीसावर अमेरिकेत प्रवेश केला. त्यातील 4 हजार 400 भारतीय मुदत संपल्यावरही अमेरिकेत राहिले. त्यातील 1,567 विद्यार्थ्यांनी नंतर अमेरिका सोडली आणि 2 हजार 833 लोक अजूनही अमेरिकेत राहात असावेत.