तामिळनाडूत जातीची भिंत कोसळली, 400 दलितांनी स्वीकारला इस्लाम!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2020 01:09 PM2020-02-15T13:09:04+5:302020-02-15T13:35:56+5:30
तामिळनाडूतल्या कोईम्बतूर जिल्ह्यात जवळपास 400 दलितांनी इस्लाम धर्म स्वीकारल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
चेन्नईः तामिळनाडूतल्या कोईम्बतूर जिल्ह्यात जवळपास 400 दलितांनी इस्लाम धर्म स्वीकारल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तमीळ पुलिगल काची नावाच्या एक दलित संघटनेनं हा दावा केला आहे. संघटनेच्या माहितीनुसार, 5 जानेवारीनंतर जवळपास 40 कुटुंबीयांचं धर्मांतर करण्यात आलं असून, ही प्रक्रिया अद्यापही सुरूच आहे. दलितांनी अचानक एवढ्या मोठ्या संख्येनं धर्मांतर करण्याच्या मागे भिंत कोसळल्याचं कारण देण्यात येत आहे, ज्यात 17 जणांचा मृत्यू झाला होता. दलित ग्रामवासीयांच्या मते, त्यांच्या समुदायाला कमीपणा दाखवण्यासाठी ती भिंत बांधण्यात आली होती.
इस्लाम स्वीकारणाऱ्या दलितांनी प्रतिज्ञापत्रात सांगितलं की, आमच्या इच्छेनुसार हे धर्मांतर केलं जात आहे. CNN-News18च्या हाती लागलेल्या प्रतिज्ञापत्रात लिहिलेलं आहे की, गेल्या तीन वर्षांपासून इस्लाम धर्मानं आम्ही प्रेरित होतो. आता मी इस्लामचे धार्मिक कायदे आणि सिद्धांतांच्या कारणास्तव धर्माचं पालन करण्याचा निर्णय घेतला आहे. कोणा दुसऱ्याच्या सांगण्यावरून मी हा निर्णय घेतलेला नाही. आम्ही प्रामाणिकपणे इस्लाम धर्म स्वीकारत आहोत. तसेच स्वेच्छेनं मुस्लिम नावं स्वीकारत आहोत.
जे लोक कायद्यानुसार धर्मांतर करत आहेत, त्यांना पोलिसांकडून धमक्या दिल्या जात असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक जण धर्मांतरबाबत उघड उघड बोलत नाहीत. तसेच काही जण धर्म परिवर्तन केल्याचं स्वीकारणास धजावत आहेत. तमीळ पुलिगल काचीच्या सदस्यांनी सांगितलं की, आमच्यासोबत वारंवार भेदभाव, हल्ला आणि अपमान होतो आहे. आम्हाला अस्पृश्य समजलं जात आहे. आम्हाला मंदिरात प्रवेश करणं आणि दुसऱ्यांसोबत दुकानात चहा प्यायण्याची परवानगी नाही. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये घोषणा करण्यात आली होती की, जिल्ह्यात 3,000 लोक जानेवारी 2020पर्यंत इस्लाम धर्म स्वीकारतील. दलितांच्या या भूमिकेमुळे ग्रामीण भागातील एक वर्ग नाराज आहे.