आसाममधील पुराचा ५४ लाख जणांना फटका, ८१ मृत्यूमुखी; पंतप्रधान मोदींकडून मदतीचं आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2020 04:51 PM2020-07-19T16:51:10+5:302020-07-19T17:06:55+5:30
पंतप्रधान मोदींचा आसामचे मुख्यमंत्री सोनोवाल यांच्याशी संवाद; सर्वतोपरी मदतीचं आश्वासन
पुराचा फटका बसलेल्या आसामला पूर्ण सहकार्य करण्यात येईल, असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं आहे. आसाममधील पुराचा फटका ३० जिल्ह्यांमधल्या ५४ लाख नागरिकांन बसला असून यामुळे आतापर्यंत ८१ जणांचा मृत्यू झाला आहे. या संदर्भात पंतप्रधान मोदींनी आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्याशी संवाद साधला असून राज्यातल्या परिस्थितीची माहिती त्यांच्याकडून घेतली आहे. राज्याला सर्वतोपरी सहाय्य करण्याचं आश्वासन मोदींकडून देण्यात आलं आहे.
पंतप्रधान मोदींनी संपर्क साधून राज्यातल्या विविध विषयांची माहिती घेतल्याचं मुख्यमंत्री सोनोवाल यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितलं. 'पंतप्रधान मोदींनी आसाममधील पूरस्थिती, कोरोना संकट आणि बघजन तेलविहिरीतील आगीबद्दलची माहिती फोनवरून घेतली. त्यांनी याबद्दल चिंता व्यक्त केली. या कठीण काळात देश तुमच्यासोबत असून राज्याला आवश्यक ती सर्व मदत देण्यात येईल, असं आश्वासन मोदींनी दिलं, असं सोनोवाल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
Hon'ble PM Shri @narendramodi ji took stock of the contemporary situation regarding #AssamFloods2020, #COVID19 and Baghjan Oil Well fire scenario over phone this morning.
— Sarbananda Sonowal (@sarbanandsonwal) July 19, 2020
Expressing his concern & solidarity with the people, the PM assured all support to the state.
पुरामुळे आसामचं मोठं नुकसान झालं आहे. पुरामुळे आतापर्यंत ८१ जणांचा मृत्यू झाला असून भूस्खलनामुळे मृत पावलेल्यांची संख्या २६ इतकी आहे. त्यामुळे या वर्षी आलेल्या पुरात आणि त्यामुळे झालेल्या भूस्खलनात मृत पावलेल्यांचा आकडा १०७ वर जाऊन पोहोचला आहे. पुराचा फटका बसलेल्या नागरिकांना आतापर्यंत राज्य सरकारकडून ९९ हजार १७६ क्विंटल तांदूळ, १९ हजार ३९७ क्विंटल डाळ आणि १ लाख ७३ हजार लीटर मोहरीच्या तेलाचा पुरवठा करण्यात आला आहे.
सर्व मंत्री आणि आमदारांनी त्यांच्या जिल्ह्यांमधील पूरग्रस्तांना आवश्यक ती मदत करावी, असं आवाहन मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी केलं आहे. राज्यातल्या ३० जिल्ह्यांना पुराचा मोठा फटका बसला आहे. १६७ पूल, १६०० पेक्षा अधिक रस्त्यांचं पुरामुळे मोठं नुकसान झालं आहे.