यूपी, राजस्थानात मुसळधार पाऊस व वादळाचं थैमान, 70 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2018 11:12 AM2018-05-03T11:12:09+5:302018-05-03T11:12:09+5:30
उत्तर भारत, दक्षिण भारतात त्याचबरोबर दिल्ली-एनसीआरमध्ये हवामानात अचानक बदल पाहायला मिळतो आहे.
जयपूर- उत्तर भारत, दक्षिण भारतात त्याचबरोबर दिल्ली-एनसीआरमध्ये हवामानात अचानक बदल पाहायला मिळतो आहे. राजस्थान, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशात आलेलं वादळ आणि मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.
बुधवारी संध्याकाळपासून उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये मुसळधार पाऊस व वादळाने थैमान घातलं आहे. यामध्ये एकुण 72 जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशात मृत्यू झालेल्यांची संख्या 45 आहे तर 38 जण जखमी झाले आहेत. दुसरीकडे आगऱ्यामध्ये 36 जणांचा मृत्यू झाला आहे. बिजनौर, शहाँरानपूर, बरेलीमध्ये एकुण नऊ जणांचा मृत्यू झाला.
राजस्थानमध्येही वादळ व पावसाचा कहर कायम आहेत. राजस्थानमध्ये 27 जणांचा मृत्यू झाला असून 100 जण जखमी झाली आहेत. अलवर, भरतपूर आणि भोलपूर जिल्ह्यामध्ये विजेचे खांब व अनेक झाडं पडल्याचं वृत्त आहे. यापैकी नऊ जणांचा भरपूरमध्ये मृत्यू झाला. तीन जण अलवर, तीन जण भरतपूर आणि दोन जण झुंझुनूमध्ये दगावली आहेत.
वादळी वाऱ्याने रेल्वे सेवेवरही मोठा परिणाम झाला. रेल्वेसेवा ठप्प झाली. जोरदार वाऱ्यामुळे संपूर्ण राज्यात धुळीचं साम्राज्या पसरलं होतं. बुधवारी संध्याकाळी खंडीत झालेला वीजपुरवठा अजूनही सुरू झालेला नाही. राजस्थान सरकारकडून अनेक ठिकाणी हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. काही भागात एनडीआरएफची पथकं तैनात करण्यात आली आहेत.