नरेंद्र मोदींचे फॉलोअर्स फेक असल्याचा सर्व्हे आमचा नाही; ट्विटरचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2018 04:54 PM2018-03-15T16:54:07+5:302018-03-15T16:54:07+5:30
फेक फॉलोअर्सच्याबाबतीत जगात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पहिला क्रमांक लागत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले होते.
नवी दिल्ली: ट्विटरवरील फेक फॉलोअर्ससंदर्भात काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेला एक अहवाल सोशल मीडियावरील चर्चेच्या केंद्रस्थानी होता. या अहवालानुसार जगातील अनेक प्रसिद्ध व्यक्तींचे ट्विटरवरील फॉलोअर्स खोटे (फेक) असल्याची खळबळजनक माहिती समोर आली होती. एवढेच नव्हे तर फेक फॉलोअर्सच्याबाबतीत जगात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पहिला क्रमांक लागत असल्याचेही निष्पन्न झाले होते. त्यांच्या एकूण फॉलोअर्सपैकी 60 टक्के फॉलोअर्स बनावट असल्याचे म्हटले होते.
या पार्श्वभूमीवर ट्विटरकडून एक स्पष्टीकरण प्रसिद्ध करण्यात आले आहे. यामध्ये ट्विटरने संबंधित अहवाल आमचा नसल्याचे म्हटले आहे. बनावट फॉलोअर्स शोधण्यासाठी वापरण्यात आलेले मापन यंत्रणा ट्विटरची नव्हतीच. ट्विटर ऑडिटसाठी वापरण्यात आलेल्या पद्धतीत अनेक त्रुटी होत्या. त्यामुळे या अहवालाला गांभीर्याने घेऊ नये, असे स्पष्टीकरण ट्विटरच्या प्रवक्त्यांकडून देण्यात आले आहे.
ट्विटरकडून जो अहवाल बनावट असल्याचा दावा करण्यात आला आहे, त्यामध्ये नरेंद्र मोदींचे नाव पहिल्या क्रमांकावर होते. दींचे ट्विटरवर एकूण चार कोटी फॉलोअर्स आहेत. त्यापैकी तब्बल 2 कोटी 40 लाख फॉलोअर्स बोगस असल्याचे निष्पन्न झाले होते मोदींखालोखाल पोप फ्रान्सिस दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रमप या यादीत चौथ्या क्रमांकावर होते. त्यांचे 37 टक्के फॉलोअर्स बनावट असल्याचे ट्विटर ऑडिटमध्ये म्हटले होते.