साठी ओलांडलेल्यांचा काळ संपला
By Admin | Published: October 18, 2015 10:21 PM2015-10-18T22:21:36+5:302015-10-18T22:21:36+5:30
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी पुढील वर्षी मार्च वा त्याआधी पक्षाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारतील, तेव्हा ते आपल्यासोबत नवी टीम घेऊन येतील.
हैदराबाद : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी पुढील वर्षी मार्च वा त्याआधी पक्षाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारतील, तेव्हा ते आपल्यासोबत नवी टीम घेऊन येतील. या नव्या व्यवस्थेत साठी ओलांडलेले पक्षनेते केवळ सल्लागाराची भूमिका साकारताना दिसतील, असे संकेत पक्षाचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी रविवारी दिले.
एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत रमेश बोलत होते. सत्तरी ओलांडलेल्या नेत्यांना सन्मानपूर्वक निरोप देण्याचा सल्ला देत, पक्षातील परिर्वतनाची प्रक्रिया सहज असेल, यावर रमेश यांनी भर दिला. राहुल गांधी पक्षाध्यक्षपदाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतील, तेव्हा ज्येष्ठ नेत्यांना सन्मानपूर्वकच वागणूक मिळेल. मोदींनी आपल्या ज्येष्ठ नेत्यांसोबत जे काही केले, तसे राहुल गांधी करतील, असे मला अजिबात वाटत नाही. मोदींनी लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, यशवंत सिन्हा, जसवंत सिंह या प्रत्येकाला ‘सायबेरिया’ला पाठवून दिले; पण राहुल गांधींनी काँग्रेसची सूत्रे आपल्या हातात घेतल्यास ती सूत्रे कुण्या एका व्यक्तीच्या हाती नसतील, तर एक संपूर्ण टीम तिथे असेल. त्याचमुळे ही टीम निवडण्यासाठी राहुल अधिक वेळ घेत आहेत. माझ्याकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, राहुल गांधींना एक सक्षम टीम हवी आहे आणि ती उभी करण्यासाठी, ते वेळ घेत आहेत, असे रमेश म्हणाले.
या वर्षाच्या प्रारंभी रमेश यांनी राहुल गांधी २०१५ मध्ये अध्यक्षपद सांभाळतील, असे संकेत दिले होते. मात्र, आता राहुल गांधी टीमची बांधणी करण्यात गुंतले असल्याचे ते म्हणत आहेत.
राहुल गांधी अध्यक्षपदाची सूत्रे कधी स्वीकारणार? असे विचारले असता, २०१५ अद्याप संपलेले नाही. कदाचित मार्चपर्यंत हे होईल, असे ते म्हणाले. अर्थात, निश्चित वेळ केवळ सोनिया गांधी आणि स्वत: राहुल गांधी या दोनच व्यक्ती सांगू शकतील, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
काँग्रेसमध्ये वरिष्ठ स्तरावरील नेतृत्व बदल म्हणजे निश्चितपणे एका पिढीचा बदल असतो. १९८४ मध्ये राजीव गांधी पंतप्रधान बनले तेव्हा हेच दिसले होते. येत्या काळात काँग्रेसमध्ये तीस व चाळिशीतील नेत्यांना मुख्य भूमिकेत आणावे लागेल. साठी ओलांडलेल्या नेत्यांना काळ आता संपलेला आहे; पण त्यांच्याही अनुभवाचा लाभ घेतला जाईल. त्यांनी स्वत:हून स्वत:चा अनुभव, ज्ञान दिले पाहिजे; पण सत्तरीनंतरच्या नेत्यांना सन्मानपूर्वक निरोप दिला गेला पाहिजे, असे मतही त्यांनी मांडले.