ओव्हरटेक करणाऱ्यास आमदार पुत्राने ठार मारले
By admin | Published: May 9, 2016 04:24 AM2016-05-09T04:24:55+5:302016-05-09T04:24:55+5:30
संजदच्या( जेडी-यू) आमदार मनोरमा देवी यांचा मुलगा रॉकी कुमार यादव याने कार ओव्हरटेक केल्यामुळे संतप्त होत एका २० वर्षीय युवकाला गोळ्या झाडून ठार केले.
गया : संजदच्या( जेडी-यू) आमदार मनोरमा देवी यांचा मुलगा रॉकी कुमार यादव याने कार ओव्हरटेक केल्यामुळे संतप्त होत एका २० वर्षीय युवकाला गोळ्या झाडून ठार केले. बिहारच्या गया येथे पोलीसलाईनजवळ ही घटना घडल्यानंतर या भागात नागरिकांनी जोरदार निषेध करीत रॉकीच्या अटकेची मागणी केली आहे.
विधान परिषदेच्या सदस्य असलेल्या मनोरमादेवी यांचे पती बिंदेश्वरीप्रसाद यादव ऊर्फ बिंदी यादव आणि त्यांचा सुरक्षा रक्षक राजेश कुमार यांना पोलिसांनी अटक केली आहे. रॉकी आणि त्यांच्यासोबत असलेल्यांच्या कारला २० वर्षीय आदित्यकुमार सचदेवा आणि त्याच्या चार मित्रांच्या कारने ओव्हरटेक केले होते. त्यानंतर रॉकीने या कारला रोखत गोळ्या झाडल्या. रॉकी कारमधील सहकाऱ्यांसोबत फरार झाला असून पोलिसांनी त्याचा शोध चालविला आहे.
हत्येला राजकीय रंग
आदित्यकुमार याला अनुराग नारायण वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. रॉकीच्या निवासस्थानी बंदुकीच्या फैरी आणि कार्बाईन आढळून आले. दरम्यान या घटनेला राजकीय वळण लाभले आहे.
विरोधी पक्षनेते प्रेमकुमार यांनी मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेत मोठ्या जमावाला संबोधित केल्यानंतर लोकांनी रॉकीच्या अटकेची मागणी करीत महावीर पुलावर वाहतूक रोखत निदर्शने केली. बिंदेश्वरी प्रसाद यादव यांना यापूर्वी २०११ मध्ये मोठ्या प्रमाणात दारूगोळा बाळगल्याबद्दल अटक केली होती. त्यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली गजाआड करण्यात आले होते. (वृत्तसंस्था)