मी माझ्या इच्छेनं मुसलमान, कोणाचीही जबरदस्ती नाही, ओवैसींचा रामदेव बाबांवर पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2019 10:59 AM2019-02-10T10:59:52+5:302019-02-10T13:13:33+5:30
एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी योगगुरू रामदेव बाबांनी 'प्रभू रामचंद्र हे फक्त हिंदूंचेच नाही तर मुस्लिमांचेही पूर्वज आहेत, या विधानावर आक्षेप नोंदवला आहे.
नवी दिल्ली- एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी योगगुरू रामदेव बाबांनी केलेल्या 'प्रभू रामचंद्र हे फक्त हिंदूंचेच नाही तर मुस्लिमांचेही पूर्वज आहेत, या विधानावर आक्षेप नोंदवला आहे. आम्ही कोणाच्याही धर्माविरोधात नाही. परंतु दुसऱ्यांवर स्वतःचा धर्म लादणे चुकीचे आहे. अशी विधानं संघ परिवाराकडून वारंवार केली जातात. भारतात आम्ही मुसलमान स्वतःच्या इच्छेनं झालो आहोत. कोणीही आमच्या पूर्वजांना इस्लाम धर्म स्वीकारण्यास बाध्य केलेलं नव्हतं. 'प्रभू रामचंद्रांचं मंदिर हे अयोध्येतच होणार आहे. अयोध्येत नाही तर काय व्हॅटिकन सिटी किंवा मक्का मदिनाला होणार का? अयोध्या ही रामाची जन्मभूमी आहे हे निर्विवाद सत्य आहे. प्रभू राम हे फक्त हिंदूंचेच नाही तर मुस्लिमांचेही वंशज आहेत,' असं रामदेव बाबा यांनी म्हटलं होतं.
त्यावर ओवैसी म्हणाले, असं म्हणून तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता. भारताचं संविधान मोठं आहे की तुमची विचारसरणी?, संविधान आपल्या धर्माचं पालन करण्याचा अधिकार देतो. तुम्ही एखाद्याची चुकीची प्रतिमा समाजात पसरवत आहात. तुम्ही असे का करत आहात ?, तसेच ओवैसींना भारतरत्न पुरस्काराबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाबद्दलही विचारण्यात आले. एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी 'भारतरत्न' पुरस्कारवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. मी बोललेलो त्यात चुकीचं काय आहे ?, असा प्रतिप्रश्नही त्यांनी उपस्थितांना विचारला आहे.
A Owaisi on Ramdev's remark 'Ram matra Hindu hi nahi Musalmano ke bhi purvaj hain': Would like to tell him that keep your beliefs to yourself, imposing your beliefs is wrong. RSS&Sangh Parivar make such statements every time. We are Muslims by choice, nobody forced our ancestors. pic.twitter.com/q5HW0f1iRP
— ANI (@ANI) February 9, 2019
गेल्या काही दिवसांपूर्वी ओवैसी म्हणाले होते, 'मला सांगा आतापर्यंत ज्यांनाही भारतरत्न पुरस्कार देण्यात आला आहे, त्या यादीमध्ये किती दलित, आदिवासी, मुस्लिम, गरीब, उच्च जातीतील लोक आणि ब्राह्मणांचा समावेश आहे?. बाबासाहेबांनाही मनापासून भारतरत्न पुरस्कार दिला गेला नाही. अगतिकतेच्या परिस्थितीत त्यांना पुरस्कार देण्यात आला', असे म्हणत असदुद्दीन ओवैसी यांनी भाजपासहीत काँग्रेसवरही निशाणा साधला होता.
'मी तुम्हाला कापून टाकेन'
भाजपा आणि काँग्रेसवर टीकास्त्र सोडताना ओवैसी आक्रमक झाले होते. मतविभाजनाच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना ते म्हणाले की, ''मी प्रक्षोभक भाषणं करतो, मतांचं विभाजन करतो, असा माझ्यावर वारंवार आरोप केला जातो. तर तुम्हाला सांगू इच्छितो की, तुमची मतं कापत नाहीय, मी तुम्हालाच कापून टाकेन'', असा धमकीवजा इशाराही ओवैसी यांनी दिला होता.