वारिस पठाण यांची बोलती ओवेसींनी केली पूर्ण बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2020 06:59 AM2020-02-22T06:59:06+5:302020-02-22T06:59:56+5:30
मागितला खुलासा; पोलिसांमध्ये गुन्हा दाखल
बंगळुरू : वादग्रस्त वक्तव्य करणारे एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांना प्रसार माध्यमांशी बोलण्यास असदुद्दीन ओवेसी यांनी बंदी घातली आहे. पठाण यांच्याकडून खुलासाही मागविला आहे. पठाण यांच्याविरुद्ध मुंबईच्या अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. एका सभेत पठाण यांनी वादग्रस्त विधान केले होते. त्याचा काँग्रेस, शिवसेना, भाजप यांनी निषेध केला आहे. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष व खा. इम्तियाज जलील यांनी सांगितले की, पठाण यांच्या वक्तव्याशी पक्ष सहमत नाही. आम्ही त्यांच्याकडून खुलासा मागविला आहे. ओवेसी यांनी पठाण यांची कानउघाडणी केली. त्यानंतर पठाण यांनी आपल्या विधानाचा विपर्यास केला, असे सांगितले.
पठाण यांची भाषा बॅ. जीना यांच्यासारखी आहे, अशी टीका करून काँग्रेसचे खा. हुसेन दलवाई म्हणाले की, मुस्लिम समाज ही भाषा कधीच मान्य करणार नाही. दरम्यान, आमदार वारीस पठाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा, अशी मागणी मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते पृथ्वीराज म्हस्के यांनी अंधेरी पोलीस ठाण्यात तक्रारीद्वारे केली आहे. त्यात शांततेसाठी पठाण यांचे वागणे धोकादायक असल्याचे म्हटले आहे.