"1.5 लाख मतांनी ओवेसींचा पराभव होणार..."; भाजप उमेदवार माधवी लता यांच्या दाव्यावर काय म्हणाले PM मोदी?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2024 01:47 PM2024-04-07T13:47:46+5:302024-04-07T13:48:46+5:30
यावेळी, निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर EPIC क्रमांक टाइप केल्यास, आपल्याला एकट्या चारमिनार भागात 60,000 बनावट मते मिळतील, येथे एकाच मतदाराकडे दोन ठिकाणची मतदार ओळखपत्रे आहेत, असा दावाही माधवी लतादीदी यांनी केला आहे.
देशात लोकसभा निवडणूक - 2024 साठी जबरदस्त प्रचार सुरू आहे. सर्वच पक्ष आपापली भूमिका घेऊन जनतेपर्यंत पोहोचत आहेत. यातच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबादमधील भाजप उमेदवार माधवी लता यांचे कौतुक केले आहे. भाजपने माधवी लता यांना असदुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात मैदानात उतरवले आहे. ओवेसी यांचा दीड लाख मतांच्या फरकाने पराभव होईल, असे माधवी लतादीदी यांनी म्हटले आहे. तसेच ओवेसी आतापर्यंत बनावट मतांच्या आधारे निवडणुका जिंकत होते, असा दावाही माधवी लतादीदी यांनी केला आहे.
हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात निवडणुकीच्या मैदानात असलेल्या भाजप उमेदवार माधवी लता सध्या सोशल मीडियावर जबरदस्त चर्चेत आहेत. एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत माधवी यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केले. यावेळी, ओवेसी दीड लाख मतांच्या फरकाने निवडणुकीत पराभूत होतील, अशी भविष्यवाणी त्यांनी केली. एवढेच नाही तर, आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये ओवेसी यांनी बनावट मतांच्या आधारे विजय मिळवला आहे, असा दावाही त्यांनी केला. तसेच, आमच्याकडे अशी खोटी व्होट बँक असती तर, आम्ही 4 हजार वर्षे जिंकत राहिलो असतो, असेही त्यांनी म्हटले आहे.
बनावट मतांच्या बळावर जिंकतायत ओवेसी -
यावेळी, निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर EPIC क्रमांक टाइप केल्यास, आपल्याला एकट्या चारमिनार भागात 60,000 बनावट मते मिळतील, येथे एकाच मतदाराकडे दोन ठिकाणची मतदार ओळखपत्रे आहेत, असा दावाही माधवी लतादीदी यांनी केला आहे.
उमेदवारीसंदर्भात काय म्हणाल्या? -
ओवेसींविरोधात मिळालेल्या उमेदवारीसंदर्भात बोलताना माधवी लता म्हणाल्या, "मला, ओवेसींविरोधात मैदानात उतरवण्यात आले असल्याची माहिती टीव्हीवरून मिळाली. मी नशीबवान आहे की आता मला तिकीट मिळाल्यानंतर, पंतप्रधान मोदीजींना भेटता येईल. ते या काळातील महायोगी आहेत. मला न भेटता अथवा मला न ओळखता, त्यांनी माझ्या कामाच्या जोरावर माझी निवड केली. मी गेली 20 वर्षांपासून कार्यरत आहे. त्यांनी मला न भेटताच तिकीट दिले, यापेक्षा पारदर्शक राजकारण काय असू शकते?"
पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना माधवी लता यांची टीव्हीवरील मुलाखत बघण्याचा आग्रह करत ट्विट केले आहे. यात, "माधवी लताजी, आपला 'आप की अदालत' अॅपिसोड असाधारण आहे. आपण तर्क आणि अत्कटतेने अत्यंत ठोस मुद्दे मांडले. आपल्याला माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा," असे म्हणण्यात आले आहे.