150 अलिशान गाड्यांचा मालक असलेला न्हावी

By admin | Published: March 2, 2017 12:53 PM2017-03-02T12:53:34+5:302017-03-02T13:04:02+5:30

रमेश बाबू यांच्याकडे एक रोल्स रॉयस, 11 मर्सिडीज, तीन ऑडी आणि दोन जॅगुआर असा गाड्यांचा ताफाच आहे

The owner of 150 luxury cars | 150 अलिशान गाड्यांचा मालक असलेला न्हावी

150 अलिशान गाड्यांचा मालक असलेला न्हावी

Next
>ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. 2 - गेल्या महिन्यात एअरो इंडियामध्ये आलेल्या जर्मनीच्या प्रतिनिधींनी अलिशान मर्सिडीज मेबॅक 600 भाड्यावर घेतली होती. या अलिशान कारची किंमत 3.2 कोटी असून भारतात ती उपलब्ध नाही. काही महिन्यांपूर्वीच ही कार जर्मनीतून भारतात आयात करण्यात आली असून आश्चर्याची गोष्ट म्हणजे या महागड्या कारचा मालक कोणी श्रीमंत व्यवसायिक नसून एक न्हावी आहे. ही कार बंगळुरुतील प्रसिद्ध न्हावी रमेश बाबू यांची आहे. विशेष म्हणजे रमेश बाबू केस कापण्यासाठी फक्त 75 रुपये घेतात. त्यांना महागड्या अलिशान गाड्यांची हौस आहे. या गाड्या ते भाड्यानेही देतात. 
 
गेल्याच महिन्यात रमेश बाबू यांनी नवी मर्सिडीज मेबॅक घेतली आहे. बंगळुरु शहरात फक्त विजय माल्ल्या आणि एका बांधकाम व्यवसायिकानंतर फक्त रमेश बाबू यांच्याकडेच ही कार आहे. 
 
विशेष म्हणजे रमेश बाबू यांच्याकडे ही एकच कार नसून याव्यतिरिक्त एक रोल्स रॉयस, 11 मर्सिडीज, तीन ऑडी आणि दोन जॅगुआर असा गाड्यांचा ताफाच आहे. रमेश टूर अॅण्ड ट्रॅव्हल्सचे मालक असलेले रमेश बाबूरोज पाच तास आपल्या सलूनमध्ये काम करतात. इतक्या महागड्या गाड्यांचे मालक असतानाही आपल्या मुख्य व्यवसायापासून ते लांब राहू इच्छित नाहीत.
 
रमेश बाबू आपल्या सफेद रोल्स रॉयसमधून शहरात फेरफटका मारत असतात. या महागड्या गाड्यांसाठी रमेश यांनी बँकेतून भलं मोठं कर्जही घेतलं आहे. पण शहरातील अनेक श्रीमंत लोकांनी त्यांना आपलं ग्राहक बनवलं असल्याने त्यांचं सगळं सुरळीत चालू आहे. 
 
'माझ्यावर देवाचा आशिर्वाद असल्याने मी इथपर्यंत पोहोचू शकलो आहे. जगातील सर्व अलिशान गाड्यांचा मी मालक व्हावा अशी माझी इच्छा आहे. माझं मूळ काय आहे हे मी विसरु नये असंही मला वाटतं. वडिलांच्या मृत्यूनंतर माझ्या आईने फार कष्ट घेऊन गरिबीत माझा सांभाळ केला आहे. त्यामुळे मी अजूनही सलूनमध्ये काम करतो', असं रमेश बाबू यांनी सांगितलं आहे. 
 
जेव्हा वडिलांचं निधन झालं तेव्हा रमेश बाबू फक्त नऊ वर्षांचे होते. दहावी पास केल्यानंतर त्यांनी शिक्षण सोडलं आणि  खानदानी न्हावीचा व्यवसाय सुरु केला. 1994 रोजी त्यांनी मारुती ओमनी खरेदी केली आणि भाड्याने देण्यास सुरुवात केली. यानंतर त्यांना गाड्यांची हौसच लागली. आतापर्यंत त्यांनी 150 अलिशान गाड्या विकत घेतल्या असून या सर्व गाड्या भाड्याने देतात. 2011 मध्ये रोल्स रॉयस खरेदी केल्यानंतर ते प्रकाशझोतात आले होते.
 
 

Web Title: The owner of 150 luxury cars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.