शिपायाजवळ सापडली 10 कोटींची अवैध संपत्ती, 18 प्लॉट्सचा होता मालक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2018 09:56 PM2018-05-02T21:56:06+5:302018-05-02T21:56:06+5:30
आंध्र प्रदेशमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आंध्र प्रदेशमधल्या वाहतूक विभागातील शिपायाला मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं नेल्लोर येथून अटक केली.
अमरावती- आंध्र प्रदेशमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आंध्र प्रदेशमधल्या वाहतूक विभागातील शिपायाला मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं नेल्लोर येथून अटक केली. या शिपायाजवळ 10 कोटींची अवैध मालमत्ता सापडली आहे. 55 वर्षीय के. नरसिम्हा रेड्डी हा नेल्लोरमध्ये उपपरिवहन आयुक्तांच्या कार्यालयात शिपायाचं काम करतो. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यानं 18वा जमिनीचा प्लॉट घेतला, त्यावेळीच एसीबीनं त्याला पकडण्यासाठी सापळा रचला. प्रतिमहिना 40 हजारांहून कमी पगार घेणा-या शिपायानं एवढी मालमत्ता जमवल्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागही त्याच्या मागावर होते. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं त्याच्या दुमजली घरात छापा मारला.
या छाप्यात एसीबीला सोने आणि हि-यांसह कोट्यवधी रुपयांचे दागिने सापडले. एसीबीनं जवळपास सहा जागी छापेमारी केली. छापेमारीत एसीबीला दोन किलो सोने, सात किलो चांदी, 7.70 लाख रुपये रोकड, 50 एकरांहून अधिक जमीन, 17 दुकानांसह एका पेंटहाऊसची माहिती मिळाली. या शिपायाचा महिन्याकाठी पगार फक्त 40 हजार रुपये होता. छापेमारीत सापडलेल्या कोट्यवधींच्या संपत्तीनं एसीबी संभ्रमात पडली आहे.
तसेच आरोपीनं एक कोटीची जीवन विमा पॉलिसी काढली असून, त्याच्याकडे 10 लाख आणि 20 लाखांच्याही एलआयसीच्या पॉलिसीही आहेत. एसीबीच्या माहितीनुसार, नरसिम्हा रेड्डी हा 22 ऑक्टोबर 1984पासून डीटीसी ऑफिसमध्ये शिपायाचं काम करतो. गेल्या 34 वर्षांत कोणतीही पदोन्नती न घेता तो या पदावर काम करतोय. 1984मध्ये नरसिम्हा याचा पगार प्रतिमहिना 650 रुपये होता. एसीबीच्या माहितीनुसार, 1992पासून त्यानं प्लॉट खरेदी करणं सुरू केलं होतं आणि स्वतः 3300 स्क्वेअर फुटांच्या दुमजली बिल्डिंगमध्ये तो राहत होता. त्याचे 18 प्लॉट्स आणि शेती पकडून जवळपास 10 कोटींची संपत्ती असू शकतो. रेड्डी याला लाच स्वीकारायची सवय लागल्यामुळे त्यानं पदोन्नतीही नाकारली होती. रेड्डीनं 1992पासून नेल्लोरच्या ग्रामीण मंडळातील भूखंडांची खरेदी सुरू केली होती. गेल्या 10 वर्षांत त्यानं एवढी मालमत्ता जमवली आहे.