ऑक्सिजन तुटवड्यामुळे ३३ रुग्णांचा मृत्यू , नातेवाईकांची रुग्णालयात तोडफोड
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 02:08 AM2021-05-04T02:08:06+5:302021-05-04T02:08:27+5:30
संतप्त नातेवाईकांची रुग्णालयात तोडफोड
बंगळुरू/मेरठ/भोपाळ : कर्नाटकमधील चामराजनगर येथे जिल्हा रुग्णालयात गेल्या चोवीस तासांत ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे २४ रुग्ण दगावल्याची घटना घडली. त्यात काही कोरोना रुग्णही आहेत. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
उत्तर प्रदेशातील मेरठमधील न्यूटीमा हॉस्पिटलमध्ये रविवारी सायंकाळी ऑक्सिजन पुरवठा अचानक बंद पडून पाच रुग्णांच्या मृत्यू झाला तसेच मध्य प्रदेशमधील बारवाणी जिल्हा रुग्णालयात शनिवारी ऑक्सिजनअभावी चार कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला.
चामराजनगर येथे मृत रुग्णांच्या नातेवाइकांनी जिल्हा रुग्णालयाच्या बाहेर जमून जोरदार निदर्शने केली. तर मेरठमध्ये डॉक्टरांचे दुर्लक्ष झाल्यानेच हा प्रकार घडल्याचा आरोप करीत मृतांच्या संतप्त नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये जोरदार तोडफोड केली. चामराजनगरचे पालकमंत्री एस. सुरेशकुमार यांनी सांगितले की, ऑक्सिजनचा तुटवडा रविवारी फक्त रात्री १२.३० ते २.३० दरम्यान झाला होता. त्यामुळे सर्व २४ रुग्ण ऑक्सिजनच्या टंचाईमुळे मरण पावले असण्याची शक्यता नाही. (वृत्तसंस्था)